सागरी सेतूकडून बीकेसीकडे जाणारी मार्गिका सुरू

मुंबई : वरळी सागरी-सेतूकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे (बीके सी) जाणाऱ्या कलानगर जंक्शन येथील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे आणि मालाड येथील अद्यावत करोना केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उद्घाटन के ले. कलानगर जंक्शन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची या उड्डाण पुलामुळे सुटका होणार असून प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.

‘धारावी वाढली आहे. तसेच बीकेसीतील वाहतुकीत वाढ होत आहे. यातून या परिसरात कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता एक-एक मार्ग तयार के ला जात आहे. या मार्गिके मुळे आता कलानगर जंक्शनला होणारी वाहतूक कोंडी होणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त के ला. या कार्यक्र माला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान आणि धारावी टी जंक्शनकडून सागरी सेतूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकू ण तीन, दोन पदरी मार्गिकांचे उड्डाण पूल बांधले जात आहेत. जानेवारी २०१७ मध्ये या उड्डाण पुलांच्या कामासाठी निविदा निश्चित करून कार्यादेश देण्यात आले होते. त्यानुसार पुढील ३० महिन्यांत म्हणजेच  २०१९ च्या मध्यापर्यंत या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाआड येणारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये स्थानांतरित करणे, ‘मेट्रो लाइन २ बी‘ची एकात्मिक संरचना तयार करणे, त्याचबरोबर उड्डाण पुलाच्या संरेखनात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे उड्डाण पुलाचे काम रखडले होते. त्यातच खारफुटीसाठी वनविभागाची परवानगी, रस्त्यांवरील विविध सेवा मार्ग काढणे व त्या पुन्हा कार्यान्वित करणे आदी कामे करावी लागणार असल्याने कामाला विलंब झाला होता. तसेच करोनामुळे मजूर परगावी गेल्याने काम थंडावले होते. त्यामुळे हा उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास जाण्यास सुमारे दोन वर्षांचा विलंब झाला. अखेर हे सर्व अडथळे दूर करत सागरी सेतूकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या ८०४ मीटर लांबीचा आणि ७.५० मीटर रुंद दोन पदरी मार्ग सुरू झाला आहे.

या मार्गामुळे कलानगर जंक्शनला न थांबता वाहनांना सागरी सेतूकडे आणि वांद्रे कुर्ला संकुलाकडे ये-जा करता येणार आहे. त्यातून याचा फायदा शहरातून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या वाहनचालकांना होणार असून प्रवासाचा वेळ दहा मिनिटांनी कमी होणार आहे.

दरम्यान, धारावी टी जंक्शकडून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या ३१०.१० मीटर लांबीच्या मार्गाचे काम मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामामुळे रखडले आहे. मेट्रोच्या खांबांचे (पिलर) काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गिके चे काम पूर्ण करता येणार आहे. ही मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू केली होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

भाजपचा बहिष्कार

वांद्रे कलानगर जंक्शन येथील उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव नसल्याने भाजपने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.  एमएमआरडीएच्या विकासकामामध्ये विधानसभेचे फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. परंतु उड्डाण पूल मार्गिकेच्या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव असले तरी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख नाही. महाराष्ट्रातील राजकीय परंपरेला हे न शोभणारे आहे. त्यामुळे दरेकर यांनी या कृतीचा तीव्र निषेध नोंदवत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.