मुंबई : देशातील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकांपैकी एक मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक आहे. दररोज येथून अर्धशतकांहुन अधिक रेल्वेगाड्या धावतात. सीएसएमटीतील पुनर्विकास कामानिमित्त सुमारे ८० दिवस फलाट क्रमांक १८ बंद केला जाणार आहे.

रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) मार्फत सुरू असलेल्या सीएसएमटी येथील पुनर्विकास कामानिमित्त १ ऑक्टोबर ते १९ डिसेंबरपर्यंत सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १८ वर ब्लाॅक असेल. ब्लाॅक कालावधीत फलाट क्रमांक १८ वर पायाभूत कामे करण्यासाठी सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामे हाती घेतली आहेत.

पुढील सूचना मिळेपर्यंत या रेल्वेगाड्या अंशत: रद्द

गाडी क्रमांक १२११२ अमरावती ते सीएसएमटी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ११००२ बल्लारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या दादरपर्यंत चालवण्यात येतील. दादर ते सीएसएमटी दरम्यानचा रेल्वेगाडीचा प्रवास रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडेल.

दिवाळी, हिवाळी हंगाम प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे

ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून, बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक असते. परंतु, ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठा ब्लाॅक घेण्यात येत असल्याने, प्रवाशांची मोठी गैरसोय होईल. रेल्वेगाडी पकडण्यासाठी आणि इच्छित डबा पकडण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.

तसेच हिवाळी हंगामात प्रवासी फिरण्यासाठी पर्यटन स्थळी जातात. परंतु, ब्लाॅकमुळे त्यांचा प्रवास रखडेल. बॅगा, सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दमछाक होण्याची शक्यता आहे

महापरिनिर्वाण दिनी अनुयायांची होणार धावपळ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी, दादर येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी रेल्वे मार्गाने येतात. यावेळी, या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका अनुयायांना बसू शकतो. रेल्वे मार्गाने येणारे बहुतांश अनुयायी दादरला न उतरता सीएसएमटीला उतरून, उपनगरीय रेल्वे सेवेने दादर गाठून कमी गर्दीचा मार्ग निवडतात. परंतु, सीएसएमटी येथे रेल्वेगाड्या आल्याच नाही किंवा अनेक रेल्वेगाड्या दादर येथेच अंशतः रद्द केल्या तर, नियमित प्रवासी आणि अनुयायांची एकाचवेळी गर्दी होईल.