मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला. तसेच दिशा हिची हत्या झाल्याच्या आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचा हत्येशी संबंध असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापज्ञात स्पष्ट केले.

दिशा हिची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली. त्या वेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात, सतीश यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमके काय घडले हे सविस्तरपणे विशद करण्यात आले आहे. तसेच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सातत्य असल्याचे म्हटले.

या प्रकरणाच्या वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून दिशाची हत्या झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. याउलट, तिच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. शिवाय, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचेही या अहवालात नमूद केल्याचे पोलिसांनी म्हटले. पोलिसांनी केलेल्या तपासाव्यतिरिक्त काहीही आढळलेले नसल्याचे विशेष तपास पथकानेही म्हटले होते. तो तपास अद्याप सुरू आहे, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले, तसेच याचिका फेटाळण्यायोग्य असून ती फेटाळण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचिका ही सूडबुद्धीने -आदित्य ठाकरे

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपले नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आले आहे. आपल्याविरोधात द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी, निरर्थक याचिका केल्याचा दावाही ठाकरे यांनी याचिकेत केला आहे.