मुंबई : मध्य रेलवेवरील डोंबिवली स्थानकावर १२ मीटर रुंद पादचारी पुलासाठी (एफओबी) तुळया उभारण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येईल. हा ब्लाॅक बुधवारी रात्री १२.२० ते ३.२० दरम्यान असेल. ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होईल.
दिवा – कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर बुधवारी रात्री १२.२० ते ३.२० दरम्यान तीन तासांचा, अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १.२० ते ३.२० दरम्यान दोन तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत गाडी क्रमांक ११०४१, २२८६५ आणि २२५३८ दिवा – कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. अप दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक ११०२० आणि १८५१९ कल्याण – पनवेल विभागामार्गे वळवण्यात येतील आणि कल्याण प्रवाशांना उतरवण्यासाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल.
गाडी क्रमांक २२१०४ कल्याण येथे २५ मिनिटे थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२१०२ कल्याण येथे २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १८०३० खडवली येथे १० मिनिटे थांबवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत लांबपल्ल्याच्या नियमित, विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जाऊ शकतात किंवा एका स्थानकात थांबवल्या जाऊ शकतात. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.