नुकतेच पदवीधर किंवा ब्लूकॉलर काम करणाऱ्यांना नोकरी शोधणे हे फार अवघड असते. अनेकदा ही मंडळी आपली नावे प्लेसमेंट एजन्सीमध्ये नोंदवितात. या एजन्सीकडे नोंदणी असलेल्या कंपन्यांमधील ऑफर्सच या मुलांना खुल्या होतात. याउलट कंपन्यांना एजन्सीकडे नोंदणी असलेल्या उमेदवारांकडूनच पाहिजे त्या उमेदवाराची निवड करावी लागते. या सर्वावर तोडगा काय यावर विचार करत असताना आयआयटी मुंबईतून रसायनशास्त्रातून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले दिनेश गोयल, गौरव तोश्निवाल आणि कुणाल जाधव या त्रिकुटाने एकत्र येऊन ं२ंल्ल्नु२.ूे हे संकेतस्थळ सुरू करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी मुंबईतील विविध ठिकाणच्या नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला. त्यांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत कल्पना दिली. याच प्रकारे नवीन पदवीधर किंवा ब्लूकॉलर कर्मचाऱ्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांशीही संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली.
या कंपनीची संकल्पना जानेवारी २०१४मध्ये रुजली आणि काम सुरू झाले. यात सर्वात मोठे आव्हान होते ते संस्था आणि कंपन्यांच्या भेटी. या भेटीतून लोकांना संकल्पना पटवून दिल्यानंतर नोव्हेंबर २०१४मध्ये कंपनीची नोंदणी झाली. यानंतर कंपनीचे पूर्ण वेळ काम सुरू झाले.
असे होते काम
आसान जॉब डॉट कॉम ही कंपनी नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला एक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देते. त्यामध्ये त्यांनी इच्छुक उमेदवारांची नावे आणि इतर तपशिलाची नोंदणी करायची असते. ही नोंदणी झाली की त्या उमेदवाराचा तपशील संकेत स्थळाशी जोडलेल्या सर्व कंपन्यांना उपलब्ध होतो. तसेच या सॉफ्टवेअरमध्ये वापरण्यात आलेल्या अल्गोरिदममुळे कोणती नोकरी कोणत्या उमेदवारासाठी आहे याची मांडणी करणे सोपे होते. नोकरीचे इतर पर्याय सुचविणाऱ्या संकेतस्थळांपेक्षा वेगळपणा म्हणजे इतर संकेतस्थळांवर केवळ उमेदवार आणि कंपनी यांच्यातील तपशिलाची देवाणघेवाण होते. मात्र आसान जॉब्ज कंपनी आणि उमेदवाराची मुलाखतीची वेळ निश्चित करण्याचे कामही करते. यामुळे नोकरी उपलब्ध करून देणारे इतर संकेतस्थळांशी आमची स्पर्धा नसल्याचे सहसंस्थापक कुणाल जाधव सांगतो.
असे मिळते उत्पन्न
कंपनी सुरू झाल्यांनतर निधी मिळवण्याच्या उद्देशाने झालेल्या दोन फेऱ्यांमधून कंपनीने साठ लाखांहून अधिक निधी उभा केला आहे. याचबरोबर ही कंपनी नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांकडून त्यांच्यातर्फे नोंदणीकृत केलेल्या उमेदवारासाठी त्यांनी आकारलेल्या पैशांमधील काही हिस्सा घेते. यातून कंपनीचे मुख्य उत्पन्न होते.
भविष्यात काय?
ही कंपनी सध्या मुंबई, पुणे आणि दिल्ली एनसीआर या तीन शहरांमध्ये सुमारे ८५० संस्थांसोबत काम करत आहे तर कंपनीत सुमारे १५० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र आपल्या कक्षा रुंदावत बंगळुरु आणि इतर अन्य शहरांमध्ये विस्तारण्याचा कंपनीचा मानस असल्याचे कुणालने सांगितले. तसेच सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या कंपन्यांपेक्षा वेगळ्या कंपन्या म्हणजे दूरसंचार, औषधनिर्माण कंपन्यांपर्यंत पोहचण्याचा मानसही कुणालने व्यक्त केला.
नव उद्यमींना सल्ला
कोणताही नवीन उद्योग सुरू करत असताना समस्या काय आहे हे जाणून घेऊन मग त्यावर तोडगा काढायचा असतो. हा तोडगा काढत असताना तो अधिक सोप्या पद्धतीने कसा काढता येईल याचा विचार करावा म्हणजे तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होऊ शकतो, असा सल्ला कुणालने नव उद्यमींना दिला आहे.
niraj.pandit@expressindia.com