राष्ट्रीय हरित लवादाच्या नव्या घोषणेचा परिणाम
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठीचा कार डेपो आरे कॉलनीत बांधण्यावरून सुरू असलेल्या वादाला कलाटणी मिळाली आहे. याबाबत राष्ट्रीय हरित लवादासमोर पुणे येथे चाललेल्या सुनावणीत बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने राष्ट्रीय उद्यानाच्या कक्षेतील बांधकामांबाबत नवीन घोषणा केली. या घोषणेनुसार लोकोपयोगी बांधकामांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून ५०० मीटरऐवजी १०० मीटर अंतरापर्यंतच जागा मोकळी सोडावी लागणार आहे. परिणामी, आता आरे कॉलनीत मेट्रो-३चा कार डेपो होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि सीप्झ या दोन टोकांना जोडणाऱ्या मेट्रो-३ या प्रकल्पाच्या आराखडय़ात कार डेपोची जागा आरे कॉलनीत दाखवण्यात आली होती. त्यावरून वादही सुरू झाला होता. आरे कॉलनी हे वनक्षेत्रात येत असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येणार नाही, हा राष्ट्रीय हरित लवादाचा नियम दाखवत या कार डेपोला विरोध सुरू होता. हे प्रकरण पुढे राष्ट्रीय हरित लवादासमोर गेले होते.
बुधवारी पुण्यात हरित लवादाने याबाबत घोषणा करताना आपली ५०० मीटरची मर्यादा १०० मीटपर्यंत आणली आहे. म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून केवळ १०० मीटर अंतरात कोणतेही प्रकल्प उभारता येणार नाहीत. १०० मीटरच्या बाहेर लोकोपयोगी प्रकल्पांसाठी जागा घेता येऊ शकते, असेही या लवादाने स्पष्ट केले आहे. आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या डेपोसाठीची प्रस्तावित जागा या १०० मीटरच्या बाहेर आहे. त्यामुळे आता आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या डेपोसाठीचा मार्ग सुकर झाल्याचे मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.हरित लवादाने आता मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाकडे दिल्ली, कोलकाता आणि इतर मेट्रोंच्या डेपोसाठी लागलेल्या जागेबाबतची एकत्रित माहिती मागवली आहे. ही माहिती १९ जानेवारी रोजी सुनावणीवेळी सादर होईल.