मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मंदावलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पुनरागमन केले. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस होत असून रत्नागिरीच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. आणखी काही दिवस मुंबई महानगर प्रदेशासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा मुक्काम कायम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
यंदा मोसमी पाऊस लवकरच म्हणजे २५ मे रोजी राज्यात दाखल झाला असला तरी पोषक वातावरण नसल्याने वाऱ्यांची वाटचाल गेल्या २० दिवसांपासून मंदावली होती. अखेर सोमवारी मोसमी वाऱ्यांनी जोरदार आगेकूच केली आणि निम्मे राज्य व्यापले. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी अनेक दिवसांनी दिवसभर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण केला. पावसामुळे मुंबईतील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. उपनगरी गाड्यांची वाहतूकही काही प्रमाणात मंदावली. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मंगळवारीही हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, बदलापूर या शहरांमध्येही मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले. कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली. खेडमधील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्या. होडावडा-तळवडे नदीला पूर आल्याने सावंतवाडी ते वेंगुर्ला मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.
पुढील पाच दिवस जोर कायम…
●राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर त्याचा जोर वाढला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे.
●राज्यातील काही भागांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
●सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथे गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
●विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत सरी बरसतील, असा अंदाज आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.