मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी येत्या काळात उच्चतंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून या यंत्रणेमुळे सध्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेत मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे. परिणामी, दुरुस्तीच्या काळात अचानक रद्द होणारी उड्डाण्याचे प्रमाण कमी होईल आणि प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
सध्या मुंबई विमानतळाच्या दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीमुळे कामाचा कालावधी वाढत होता. याशिवाय दुरुस्तीच्या काळात विमानांची उड्डाणांना मोठय़ा प्रमाणात फटका बसतो. याच धर्तीवर ‘विमानतळ ग्रेड स्टिल तंत्रज्ञाना’ची मदत घेतली जात आहे. जगातील प्रमुख विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी या प्रणालीचा वापर केला जातो.
यात अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने धावपट्टीवर पसरल्या जाणाऱ्या मिश्रणाचा थर (डांबर, पाणी, औषधी पदार्थ) अध्र्या तासाच्या आत कोरडा होतो. याच कामासाठी पारंपरिक पद्धतीत तास-दोन तासांचा कालावधी लागतो. वेळ वाचवण्यासाठी ही नवीन पद्धत वापरली जात आहे. यामुळे अवघ्या २० मिनिटांत अध्र्या किलोमीटरची धावपट्टीची दुरुस्ती सहज शक्य आहे. दुरुस्तीदरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने विमानतळाच्या धावपट्टीचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. हा धोका या तंत्रज्ञानाच्या मदतीने टाळणे शक्य आहे. त्याचबरोबर धावपट्टीचे आयुर्मान वाढवण्यासाठी ही प्रणालीचा उपयोग होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
विमानतळाच्या धावपट्टीचे काम कमी वेळात झाल्याने अनेक फायदे होतील. याच उड्डाणांना होणारे विलंब कमी होईल. जेणे करून प्रवाशांची गरसोय होणार नाही.
याशिवाय धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान उत्तम पद्धतीचे असल्याने धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल. येत्या काही दिवसांत एप्रिल आणि मे महिन्यात मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर आणि ३० नोव्हेंबरदरम्यान सोमवार व गुरुवारी मुंबई विमानतळावरील मोठय़ा धावपट्टीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम नियोजित वेळेआधी पूर्ण होईल, अशी अपेक्षा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.