मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच महायुतीचे जागावाटप करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत. शहा यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यापासून लांब राहिलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहा यांची परतताना विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आमदारांच्या संख्येहून अधिक जागा मिळाव्यात, असा पवार यांचा आग्रह आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून महायुती सत्तेवर यावी आणि त्या दृष्टीने जागावाटप होईल, त्याचबरोबर जाहीर वाद टाळावेत, अशा सूचना शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या.

हेही वाचा >>> Sharad Pawar : महायुती सरकार आल्याने काय बदल घडला? शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा

शहा यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांशी निवडणूक तयारीबाबत चर्चा केली. शहा यांनी सोमवारी सकाळी कुटुंबीयांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर शहा यांनी लालबागचा राजा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे वांद्रे येथे जाऊन दर्शन घेतले. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते व शिंदे हे शहा यांच्यासमवेत होते. अजित पवार रविवारी रात्री बारामतीहून मुंबईत परतले. पण शहा यांच्या समवेत ते नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीची व नाराजीची चर्चा सुरू झाली. पवार यांनी अखेर विमानतळावर जाऊन शहा यांची भेट घेवून चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीच्या जागावाटपात पवार गटामुळे भाजपच्या काही नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने ते अन्य पक्षांमध्ये जात आहेत. पवार गटाकडे असलेल्या आमदारांच्या संख्येहून अधिक जागा देण्याची भाजपची तयारी नाही. शिंदे गटातील नेत्यांनी जाहीरपणे व मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पवार गटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शहा-पवार यांच्या बैठकीतही चर्चा झाली. पवार यांनी जागावाटपात अधिक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा जागांबाबत वाद न करता जिंकून येण्याची क्षमता असलेल्या पक्षाला संबंधित जागा वाटपात देण्यात यावी, असा कानमंत्र शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.