मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर दामदुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील दोघांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. दोन्ही प्रकरणात फसवणुकीसाठी व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात आला. मुंबई पश्चिम सायबर विभागाने याप्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
स्मार्ट फोनधारकामंध्ये व्हॉट्स ॲप सर्वाधिक लोकप्रिय आहे. याच व्हॉट्स ॲपचा वापर करून फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. नागरिकांना विविध व्हॉट्स ॲप समूहाचे (ग्रुप) आमंत्रण (इन्विटेशन) पाठवून त्यात सामावून घेतले जाते. त्या व्हॉट्स ॲप समूहात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत कसा प्रचंड नफा मिळतो हे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. गुंतवणूक केल्यानंतर मात्र त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. मुंबईत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या दोन घटना घडल्या आहेत.
पहिली घटना अंधेरी येथील एका कुटुंबाच्या बाबतीत घडली. सायबर भामट्यांनी ४३ वर्षीय फिर्यादींना ८ एप्रिल रोजी ‘फेअर्स एक्सेल एन्सेबल’ या व्हॉट्स ॲप समूहात सामावून घेतले. फेअर्स एक्सेल एन्सेबल ही कंपनी सेबी नोंदणीकृत असल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि त्याबाबतचे बनावट प्रमाणपत्रही त्या समूहात पाठविण्यात आले. त्यामुळे फिर्यादींचा कंपनीवर विश्वास बसला. त्या समूहात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असा दावा मेहूल गोयल नामक व्यक्तीने केला. त्यानंतर फिर्यादीने गुंतवणूक करण्याचे ठरवले. यासाठी त्याने पत्नी, भाऊ आणि वहिनी यांना देखील त्या समूहात घेतले. त्यानंतर शेरॉन त्रिवेदी नामक महिलेने त्यांना गुंतवणूक करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्या लिकद्वारे फिर्यादीने एक ॲप डाऊनलोड केले आणि ४८ लाख ३३ हजार रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर त्यांना २ कोटी २६ लाख रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले. यातील ४ लाख रुपये फिर्यादींनी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते काढता आले नाहीत. त्यावेळी मेहूल गोयल आणि शेरॉन त्रिवेदी यांनी काही दिवसांनी पैसे काढा अन्यथा कर भरावा लागेल अशी सबब सांगितली. नंतर मात्र या दोघांनी संपर्क तोडल्यावर फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ८ एप्रिल ते २८ मे या कालावधीत फिर्यादींची ४८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
दुसऱ्या घटनेत अशाच प्रकारे अंधेरी येथील ६० वर्षीय फिर्यादीची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यांना ‘११ स्पेशल ट्रेनिंग टिम ए’ या व्हॉटसअप समूहात सामावून घेण्यात आले. तेथे पंकज वर्मा नामक व्यक्ती दररोज शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कसा फायदा मिळेल याबाबत मार्गदर्शन करीत होता. ते पाहून फिर्यादींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिव्या भट नामक महिलेने फिर्यादींना ‘ॲक्टीव अल्फा’ नामक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादींनी त्या ॲपवर गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याच्या निमित्ताने आधार कार्ड, बॅंक खाते संलग्न केले आणि ६ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत १० लाख २५ हजार रुपये गुंतवले. मात्र त्यांना कोणतीच रक्कम मिळाली नाही. यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांची लक्षात आले.
या दोन्ही प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांच्या पश्चिम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड), भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.