मुंबई : वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये २९ एप्रिल रोजी लागलेल्या भीषण आगीचा चौकशी अहवाल सहआयुक्त डी. गंगाधरण यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला आहे. या मॉलमधील अग्निशमन यंत्रणेत गंभीर त्रुटी असल्यामुळे आग भडकल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित नव्हती तसेच यंत्रणा वापरण्याचे ज्ञान सुरक्षा रक्षकांना नव्हते. त्यामुळे आगीचे गांभीर्य वाढले असे या अहवालात म्हटले आहे. तसेच ही यंत्रणा सुस्थितीत नसल्याची बाब अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेने निदर्शनास न आणल्याबद्दल या संस्थेविरोधात कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये २९ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. त्यात संपूर्ण मॉल जळून खाक झाला. तब्बल २२ तासांनी आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तळघरात तीन मजले, तळमजला आणि वर तीन मजले असा हा संपूर्ण मॉल या आगीत भस्मसात झाला आहे. सुमारे ८,००० ते १०,००० चौरस फूट क्षेत्र या आगीत जळाले. मॉलमधील सुमारे दीडशे ते दोनशे गाळे आणि त्यातील सामान जळले आहे. मात्र आगीच्या या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना चौकशी करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार पालिका आयुक्तांनी आगीच्या चौकशीची जबाबदारी सहआयुक्त डी. गंगाधरण यांच्यावर सोपवली होती. गंगाधरण यांनी या चौकशीचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला.

दरम्यान, इमारतीची अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र वर्षातून दोनदा अग्निशमन दलाकडे सादर करणे बंधनकारक आहे. वांद्रे येथील मॉलला असे प्रमाणपत्र देणाऱ्या खासगी अग्निसुरक्षा एजन्सीने यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास का आणल्या नाहीत याबाबत अहवालात विचारणा करण्यात आली असून एजन्सीविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली आहे. मॉलमधील स्प्रिंकलर्स, अलार्म, धूर शोधक यंत्रणा काम करत नव्हती. तसेच अग्निरोधक यंत्रणा वापरण्याचे ज्ञान येथील सुरक्षारक्षकांना नव्हते त्याबाबतही अहवालात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या मॉलमध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम केले नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. तळमजल्यावरील क्रोमाच्या दुकानात ही आग लागली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आग विझवायला उशीर झाला होता का ?

वांद्रे पूर्व येथील माजी आमदार झिशान सिद्दीकी यांची या मॉलमध्ये मालकी आहे. या इमारतीच्या निर्माणात त्यांची सहभागी आहे. मॉलला आग लागल्याचे समजताच पहाटेपासून सिद्दीकी हे घटनास्थळी होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अग्निशमन दलावर आरोप केले होते. अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे आग वाढली असा आरोप माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला होता. मॉलमध्ये आग लागल्यानंतर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती साधने आणि व्यवस्था होती का? सर्व अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते का? शेवटची अग्निसुरक्षा तपासणी केव्हा झाली होती? असे प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनीही उपस्थित केले होते. त्यानुसार आग विझवायला खरोखरच उशीर झाला होता याचीही अग्निशमन दलाने चौकशी करावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.