मुंबई : मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांनी आपल्या साथीदारासह अंधेरीतील एका पान टपरी चालविणाऱ्याचे अपहरण करून ४३ हजारांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून दोन्ही पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

फिर्यादी मोहम्मद आरिफ फैजान खान (३५) हे अंधेरी पश्चिम येथे पान व सिगारेट विक्रीची टपरी चालवतात. २४ जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक गाडी त्यांच्या टपरीजवळ थांबली. त्यातून ४ इसम खाली उतरले. पोलीस हवालदार हेमंत कापसे आणि सागर वाघ यांनी स्वत:ला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत नितीन गाढवे आणि चंद्रशेखर दरांडे असे आणखी दोन जण होते. खान आपल्या टपरीत गुटखा विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच्या चौकशीसाठी त्यांना एफडीए कार्यालयात घेऊन जाण्यासाठी बळजबरीने गाडीत बसवले.

सुटकेसाठी ३ लाखांची मागणी

गाडीत असताना या पोलिसांनी खान यांना दमदाटी केली. या प्रकरणातून सुटण्यासाठी तीन लाख रूपये देण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी खान यांच्याकडे केवळ १० हजार रुपये होते. त्यांनी या पोलिसांचा एक साथीदार आकाश वाघमारेच्या खात्यावर क्यूआर कोडद्वारे ३० हजार रुपये पाठवले. या चौघांनी फिर्यादींची तपासणी केली आणि खिशातील साडेतीन हजार रुपये काढून घेतले. फिर्यादींकडील एकूण ४३ हजार ५०० रुपये उकळल्यानंतर आरोपींनी फिर्यादी खान यांना कॉटन ग्रीन येथे सोडले. घरी जाण्यासाठी ७० रुपये दिले.

सीसीटीव्ही आणि गाडी क्रमांकाच्या आधारे आरोपींना पकडले

घरी आल्यावर खान यांनी आपल्या मित्रांना या प्रकाराबाबत माहिती दिली. हा फसवणूक आणि खंडणीचा प्रकार असल्याने लक्षात आल्यानंतर फिर्यादी खान यांनी नंतर डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. डी. एन. नगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यावेळी आरोपी हेमंत कापसे आणि सागर वाघ हे पोलीस असून मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात कार्यरत असून हे प्रकरण उघडकीस येताच त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. तिसरा आरोपी चंद्रशेखर दरांडे हा महाराष्ट्र सुरक्षा बलातील (एमएसएफ) कर्मचारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारही आरोपींविरुद्ध अपहरण, खंडणी, फसवणूक आणि सरकारी पदाचा गैरवापर यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली.