मुंबई : दिवाळीच्या आनंदाला सुखाची झालर लावणारी गुलाबी थंडी यंदाच्या दिवाळीत अवतरलेली नाही. मोसमी पाऊस माघारी गेल्यापासून राज्यात सर्वत्र उन्हाचा ताप वाढला आहे. कोकणासह विदर्भातही तापमानाचा पारा ३५ अंशापार गेला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा ताप कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईसह इतर भागातही सध्या उकाडा आणि उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढते. त्यामुळे दिवसभर असह्य उकाडा आणि उन्हाचा तडाखा असतो. सध्या ही परिस्थिती राज्यातील सर्वच भागात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे.

दोन दिवसांपूर्वी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमानात काहीशी घट झाली असली तरी तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३५ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

तापमानात झालेल्या वाढीमुळे सध्या नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच बसणारा उन्हाचा तडाखा आणि गरम वारे यामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट असतो. सायंकाळनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी पहायला मिळते. सांताक्रूझ येथे रविवारी देखील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र

आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकताना ही प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे मंगळवारपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. वरील दोन्ही चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.