मुंबई : राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. राज्यात पुढील तीन – चार दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे काहिली झाली आहे. अनेक भागात तापमानाचा पारा ३५ अंशापुढे नोंदला जात आहे. अशातच काही भागात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ७ नंतर काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. सीएसटी, फोर्ट, परळ, भायखळा, वरळी परिसरात शुक्रवारी गडगडाटासह पावसाच्या सरी बरसत होत्या.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, मुबंईच्या तापमानात वाढ झाल्याने असह्य उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने घामामुळे नागरिक हैराण झाले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रनारी तापमानात काहीशी घट झाली होती.

मुबंईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मेघर्गजनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे.

ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक पावसाची नोंद

ब्रह्मपुरी येथे शुक्रवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तेथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३४.१ अंश सेल्सिअस, अमरावती ३४ अंश सेल्सिअस, नागपूर ३४ अंश सेल्सिअस आणि गोंदिया येथे ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सोमवारपासून पावसाचा जोर कमी होणार

राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यानंतर वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे. पाऊस पडल्यामुळे काहीसा दिलासा मिळतो. मात्र, नंतर पुन्हा उकाडा सहन करावा लागतो.