मुंबई  : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार इतका निधी  वितरित करण्यास राज्य शासनाने  मंजुरी दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.

या बाबत शासन निर्णय शनिवारी जारी करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले जात आहे. मागील सात दिवसांत सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे, तर यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांची मदत वितरण करण्यास मान्यता दिली आहे.

सरकारने शनिवारी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिली आहे. त्यापैकी नागपूर विभागातील ३ लाख ७६ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या ३ लाख ४४ हजार ६२९.३४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३४० कोटी ९० लाख ८ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील १ लाख २ हजार ८५० शेतकऱ्यांच्या ८५ हजार ६४१.८८ हेक्टर क्षेत्रासाठी ११२ कोटी ३७ लाख रुपये. चंद्रपूरमधील ९३ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या ८१ हजार ७२६.८९ हेक्टर क्षेत्रासाठी ६९ कोटी ४६ लाख ८६ हजार रुपये. वर्ध्यातील १ लाख ४९ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या १ लाख ६७ हजार ४७६.९६ हेक्टर क्षेत्रासाठी १४२ कोटी ४० लाख ११ हजार रुपये. भंडाऱ्यातील १८ हजार ९५३ शेतकऱ्यांच्या ६ हजार ४२५.४१ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी ४८ लाख ३६ हजार रुपये. गोंदियातील सहा हजार ३९८ शेतकऱ्यांच्या दोन हजार ३०९.४६ हेक्टर क्षेत्रासाठी तीन कोटी ५० लाख २१ हजार रुपये आणि गडचिरोलीतील पाच हजार ३२६ शेतकऱ्यांच्या एक हजार ४८.८३ हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी ६७ लाख ५४ हजार रुपये निधीचा समावेश आहे.

 अमरावती विभागातील चार लाख ७८ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या पाच लाख २६ हजार ३८१.३६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४६३ कोटी ८ लाख ३० हजार रुपयांचा मदत निधी दिला जाणार आहे. अकोल्यातील दोन लाख ९ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या एक लाख ७२ हजार ८७५.१९ हेक्टर क्षेत्रासाठी १६२ कोटी ९५ लाख ३४ हजार रुपये. अमरावतीतील ४८ हजार ७१ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ८८२.७४ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ कोटी ४ लाख ५१ हजार रुपये आणि यवतमाळमधील दोन लाख २१ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७ हजार ६२३.४३ हेक्टर क्षेत्रासाठी २६२ कोटी ८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

 पुणे विभागातील आठ लाख २५ हजार १८९ शेतकऱ्यांच्या सात लाख नऊ हजार २०९.१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९५१ कोटी ६३ लाख ३७ हजार निधीचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील तीन हजार ३८८ शेतकऱ्यांच्या एक हजार ५६२.६७ हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी ४९ लाख ५ हजार रुपये. सोलापुरातील सहा लाख ७८ हजार ५९२ शेतकऱ्यांच्या पाच लाख ३८ हजार ८८९.५४ हेक्टर क्षेत्रासाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये. पुण्यातील ५२ हजार ७८९ शेतकऱ्यांच्या २१ हजार ९५१.९४ हेक्टर क्षेत्रासाठी ३४ कोटी ४२ लाख ८७ हजार रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ९० हजार ४२० शेतकऱ्यांच्या एक लाख  ४६ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रासाठी १४२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे.

 नाशिक विभागातील १५ लाख ७९ हजार २३९ शेतकऱ्यांच्या ११ लाख ५० हजार ३०१.७६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४७४ कोटी ८४ लाख ९ हजार निधीचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात चार लाख नऊ हजार ४७४ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८८ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रासाठी ३१७ कोटी १५ लाख ७७ हजार रुपये. धुळ्यातील १६ हजार ३५७ शेतकऱ्यांच्या ११ हजार ५९४.१९ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी २२ लाख ९७ हजार रुपये. नंदुरबारमधील ९३१ शेतकऱ्यांच्या ४४५.०६ हेक्टर क्षेत्रासाठी ५३ लाख ९९ हजार रुपये. जळगावातील तीन लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांच्या दोन लाख ४७ हजार २६२.०१ हेक्टर क्षेत्रासाठी २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रुपये आणि अहिल्यानगरमधील आठ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांच्या सहा लाख दोन हजार १९४.५० हेक्टर क्षेत्रासाठी ८४६ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

 कोकण विभागातील एक लाख पाच हजार २३९ शेतकऱ्यांच्या २९ हजार २३३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २८ कोटी १० लाख ६३ हजार निधीचा समावेश आहे. ठाण्यातील ३५ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या नऊ हजार ४८०.२१ हेक्टर क्षेत्रासाठी आठ कोटी ३७ लाख ६५ हजार रुपये. पालघरमधील ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या १३  हजार ७४४.२३ हेक्टर क्षेत्रासाठी १४ कोटी ४२ लाख ७ हजार रुपये. रायगडमधील १८ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या पाच  हजार ८२९.४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाच कोटी नऊ लाख ९ हजार रुपये. रत्नागिरीतील एक हजार १५३ शेतकऱ्यांच्या १०३.८८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ लाख ५३ हजार रुपये आणि सिंधुदुर्गमधील ३१५ शेतकऱ्यांच्या ७५.४८ हेक्टर क्षेत्रासाठी आठ लाख २९ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

मदत निधीचे आकड

शनिवारी तेवीस जिल्ह्यातील ३३ लाख शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता

मागील सात दिवसांत सुमारे पाच हजार कोटी रुपयांची मदत

यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत

नागपूर विभागाला ३४० कोटी ९० लाख ८ हजार रुपयांचा निधी

अमरावती विभागाला ४६३ कोटी ८ लाख ३० हजार रुपयांचा निधी

पुणे विभागाला ९५१ कोटी ६३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी

नाशिक विभागाला १४७४ कोटी ८४ लाख ९ हजार रुपयांचा निधी

कोकण विभागाला २८ कोटी १० लाख ६३ हजार रुपयांचा निधी

मदत दोन हेक्टरच्या मर्यादेतच

सरकारने मदत निधी देण्याचा धडाका लावला असला तरीही आतापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेतच मदतीचे वितरण केले जात आहे. त्यामुळे सरकारने आजअखेर दोन हेक्टरच्या मर्यादेतच मदत निधीचे वितरण केले आहे. नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता, दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत वितरीत केली जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने उर्वरीत मदत दिली जाणार आहे, अशी माहिती आपत्ती व पुनर्वसन विभागातून देण्यात आली.

पंचनामे पूर्ण होताच उर्वरीत मदत

राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागातून तातडीने मदत वितरण केली जात आहे. विभागस्तरावरून आलेल्या प्रस्तावांना काही तासांत मान्यता दिली जात आहे. ऐन दिवाळीतही विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्परतेने काम करीत आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत- जास्त मदत देण्याचा प्रयत्न राहील. पंचनामे पूर्ण होताच उर्वरीत मदत दिली जाईल, अशी माहिती आपत्ती व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.