मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील भूसंपादन जवळजवळ पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी येणाऱ्या अपेक्षित खर्चातील ८०० कोटी रुपयांची बचत एमएसआरडीसीने केली आहे. या प्रकल्पात कासार आंबोलीजवळील इमारतीतील १८० घरे बाधित होणार होती. बाधितांच्या पुनर्वसनासाठी एमएसआरडीसीला तब्बल ८०० कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार होती. मात्र आता एमएसआरडीसीने कासार आंबोलीजवळील संरेखनात बदल करून १८० घरे वाचवली आहेत. त्यातबरोबर ८०० कोटी रुपयेही वाचवले आहेत.
१२६ किमीचा वतुर्ळाकार रस्ता
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने १२६ किमी लांबीच्या पुणे वर्तुळाकार रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे. अंदाजे २६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यात करण्यात येत आहे. या १२ टप्प्याच्या निविदा अंतिम करण्यात आल्या असून काही ठिकाणी कंत्राटदारांनी प्राथिमक कामाला सुरुवात केली आहे. त्याच वेळी या प्रकल्पातील भूसंपादनही जवळजवळ पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात कासार आंबोली जवळील ३०० घरांचा समावेश असलेल्या वसाहतीतील १८० घरे बाधित होणार होती. त्यामुळे रहिवाशांनी या रस्त्याला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी नुकसान भरपाई म्हणून ८०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे कासार आंबोली येथील भूसंपादनाचा प्रश्न कठीण झाला होती. पण अखेर आता एमएसआरडीसीने हा प्रश्न निकाली लावला आहे.
४०० मीटर रस्त्यात बदल
एमएसआरडीसीने कासार आंबोलीजवळील पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाच्या संरेखनात अखेर बदल केला आहे. त्यानुसार बाधित होणाऱ्या इमारतीच्या बाजूने रस्ता वळवून घेण्यात आला आहे. ४०० मीटरच्या रस्त्यात बदल केल्याची माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. या बदलामुळे १८० घरे वाचली आहेत, तर दुसरीकडे ८०० कोटी रुपये ही एमएसआरडीसीचे वाचले आहेत. नुकसान भरपाईसाठी एमएसआरडीसीला ८०० कोटी रुपये द्यावे लागले असते. आता ही घरे वाचल्याने ८०० कोटी रुपये खर्च वाचल्याचेही वसईकर यांनी सांगितले. संरेखनात करण्यात आलेल्या या बदलासंबंधीचा प्रस्ताव नुकताच एमएसआरडीसीने राज्य सरकारडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी एमएसआरडीसीकडून केली जाणार आहे.