scorecardresearch

माळशेज घाटातील वाहतूक सुरू, मात्र पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश

माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. ते ३१ ऑगस्ट पर्यंत लागू राहतील.

malshej ghat
माळशेज घाट (प्रतिनिधिक छायाचित्र)

दरड कोसळल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली माळशेज घाटातील वाहतूक अखेर शनिवारी सुरु झाली. राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग आणि पोलीस यांनी भर पावसात आणि दाट धुके असूनही दरड, माती दूर करण्यात यश मिळवले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

माळशेज घाटात २० ऑगस्ट रोजी पहाटे दरड कोसळल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. चार दिवसांपासून दरड हटवण्याचे काम सुरु होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाच्या मुरबाड उप विभागीय कार्यालयाने कठीण परिस्थितीत काम करून हा रस्ता पूर्ववत केला. कार्यकारी अभियंता दिनेश महाजन हे देखील कामावर लक्ष ठेवून होते. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी रोजी पावसाचा जोर असल्याने थांबून थांबून काम करावे लागत होते, शिवाय दरड दूर केली असली तरी डोंगर माथ्यावरून सतत पाण्याचे प्रवाह, छोटे छोटे दगड रस्त्यावर येतच होते. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. नंतरचे दोन दिवस पाऊस बऱ्यापैकी कमी झाल्याने कामही झपाट्याने पूर्ण करता आले आणि शुक्रवारी रात्री उशिराने वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

वाहतुकीस परवानगी दिलेली असली तरी या भागातून सावधगिरी बाळगूनच वाहने नेण्यात येत आहेत. पोलीस आणि महामार्ग कर्मचारी या मार्गावर तैनात आहेत.

दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देशाप्रमाणे माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. ते ३१ ऑगस्ट पर्यंत लागू राहतील. सुट्ट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात, कुठलीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-08-2018 at 12:10 IST