डोंबिवली – डोंबिवली शिळफाटा रस्त्यावरील मध्यमवर्गिय, उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खोणी पलावा वसाहतीमधील एका इमारतींमधून मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने गुरूवारी रात्री दोन किलो ग्रॅम वजनाची मेफोड्रेन (एमडी) पावडर जप्त केली आहे. अंमली पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या या पावडरची बाजारातील किंमत दोन कोटीहून अधिक आहे.
याप्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये २० ते २६ वर्षातील दोन तरूण आणि एका २१ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. या गुन्ह्यातील सहभागी महिला एमडी पावडर विक्रीसाठी या दोन इसमांना मदत करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
खोणी पलावा वसाहतीमधील डाऊन टाऊन गृहसंकुल भागात दोन इसम आणि एक महिला अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पहिले गुप्त पध्दतीने त्या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. गुरूवारी रात्री अकरा वाजता पोलिसांनी खोणी पलावातील डाऊन टाऊन भागात संबंधित सदनिकेत छापा टाकला. त्यावेळी तेथे तीन इसम आढळून आले. एका इसमाकडून पोलिसांनी सदनिकेत दोन किलो वजनाचे मेफोड्रेन जप्त केले. आपल्या सदनिकेवर छापा पडला आहे असे समजताच या प्रकरणातील इतर दोन साथीदार पळून गेले.
पोलिसांनी सदनिकेतून एका इसमाला अंमली पदार्थांच्या पावडरसह जप्त केले. तातडीने हालचाली करून अटक इसमाच्या दोन्ही साथीदारांचा शोध घेऊन त्यांना रात्रीतून अटक केली. या प्रकरणात इतरही इसम सहभागी असण्याचा संशय पोलिसांना असून त्याआधारे पोलिस तपास करीत आहेत. दोन इसम एमडी पावडरची खरेदी करून ते या प्रकरणातील सहभागी महिलेच्या माध्यमातून विक्री व्यवहार करत होते. ही एक मोठी टोळी असण्याचा संशय पोलिसांना आहे.
मागील वर्षी पलावा वसाहतीमधून विदेशातील वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या एका प्रकरणाचा शोध घेऊन पोलिसांनी ते उघडकीला आणले होते. काही महिन्यांपासून हे वन्यजीव एका सदनिकेत बंदिस्त होते. या बंदिस्त खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीतील रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर हा वन्यजीव तस्करीचा प्रकार उघडकीला आलो होता.
कल्याण डोंबिवली परिसरातून अंमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्याची मोहीम पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षापासून सुरू आहे. याच मोहिमेतून ही कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक राम चोपडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, कलगौंडा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.