मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटातील ६५ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने मुंबई आठ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत ४७ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता गोठवण्यात आल्याची माहिती शनिवारी ईडीने दिली. त्यात बँक खाती, मुदत ठेवी, डीमॅट खाती यांचा समावेश आहे.
महापालिकेने नियुक्त केलेले कंत्राटदार मे. ॲक्यूट डिझाईन्स, मे. कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. लि., मे. जे.आर.एस. इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच मुंबई महानगरपालिकेचे उपमुख्य अभियंता प्रशांत कृष्णा तायशेट्टे (निवृत्त) यांच्या संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत गोठवण्यात आलेल्या आणि टाच आणलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ४९ कोटी ८० लाख रुपयांवर पोहोचली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यांदरम्यान अनेक आक्षेपार्ह दस्तऐवज, डिजिटल उपकरणे आणि संशयास्पद स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांचे नोंदी जप्त करण्यात आल्या असून त्याची तपासणी सुरू आहे.
महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण गैरव्यवहारामुळे महापालिकेचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
तपासात ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्राटाच्या निविदांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारांनी याबाबत बनावट कागदपत्रे सादर केली. त्यात सामंजस्य करार व बनावट ना हरकत प्रमाणपत्रांचा समावेश असल्याचा आरोप आहे. याशिवाय, महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप असून त्याबाबत ईडी तपास करीत आहे. यापूर्वी ईडीने याप्रकरणी ६ जूना रोजी १८ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर अभिनेता डिनो मोरिया व त्याच्या भावाची चौकशी केली होती.
मिठी नदीतून गाळ गाळ काढण्याच्या कंत्राटातील ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सात हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. अटक आरोपी केतन कदम व जय जोशी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपपत्राची अद्याप दखल घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गाळ उपसण्याच्या कंत्राटात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात भारतीय न्याय संहितेतील कलम ४७४ वाढवण्यात आले आहे.