मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या ‘मुंबई वन’ ‘मुंबई वन’ ॲपचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर गुरुवारी सकाळी ५.३० वाजल्यापासून हे ‘मुंबई वन’ ॲप कार्यान्वित करण्यात आले असून पहिल्या दिवशी ॲपला चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५ पर्यंत ३२ हजारांहून अधिक प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केले.

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनोसह त्या त्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करतात. प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट घ्यावे लागते. त्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. यात प्रवाशांचा वेळ जातो, त्रास होतो. ही बाब लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकाने काही वर्षांपूर्वीच एमएमआरडीएला एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत स्मार्ट कार्ड आणि ॲप तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र या कामासाठी प्रचंड विलंब झाला, पण आता मात्र ॲपचे काम एमएमआरडीएने पूर्ण केले आहे.

एमएमआरडीएच्या ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्र २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांसाठी मुंबई वन ॲप यापूर्वीच एमएमआरडीएने कार्यान्वित केले आहे. याच ॲपमध्ये सुधारणा, अत्याधुनिकीकरण करून नवीन मुंबई वन ॲप तयार करण्यात आले आहे. बुधवारी या ॲपचे लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ५.३० वाजता ॲप कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. पहिल्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत ३२ हजारांहून अधिक प्रवाशांनी ॲप डाऊनलोड केले. तर २७ हजारांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केल्याचीही माहिती मुखर्जी यांनी दिली.

‘मुंबई वन’ ॲपद्वारे ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’, ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’, ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’, नवी मुंबई मेट्रो, मोनोरेल (चेंबूर – जेकब सर्कल), मुंबई उपनगरीय रेल्वे, बेस्ट, ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी), मिरा – भाईंदर परिवहन (एमबीएमटी), कल्याण – डोंबिवली महानगर परिवहन (केडीएमटी), नवी मुंबई परिवहन सेवेचे तिकीट उपलब्ध होणार आहे. तर येत्या काळात ठाणे रिंग रोड मेट्रो, नवी मुंबईतील इतर मेट्रो मार्गिका आणि एमएमआरडीएकडून येत्या काळात सेवेत दाखल होणाऱ्या मेट्रो मार्गिकांचे तिकीटही यावरून काढता येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले.