एरवी तांत्रिक बिघाडामुळे वरचेवर कोलमडणारी वाहतूक आणि मेगाब्लॉक पाचवीला पुजलेल्या ट्रान्स हार्बर रेल्वेची सफर आता विशेष ठरणार आहे. मुंबईकरांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून राहिलेली पहिली वातानुकूलित रेल्वे या मार्गावर धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे ते पनवेल या मार्गावर ही वातानुकूलित रेल्वे धावणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित गाडी चालविण्याची तयारी पूर्ण झाली असताना गुरुवारी अचानक रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून ही गाडी मध्य रेल्वे मार्गावर चालवण्याचे जाहीर केल्याने रेल्वे वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी शनिवारी पहिली वातानुकूलित गाडी ठाणे-पनवेल या मार्गावर धावणार असल्याचे सांगितले. सूद यांनी काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथील ‘इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरी’त एका वातानुकूलित गाडीची पाहणी केली. या गाडीचे ७५ टक्के काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे आता लवकरच हार्बरकरांना वातानुकूलित गाडीची सफर करता येणार आहे. ही लोकल ६ ते ७ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिने सुरक्षेसंदर्भातील चाचण्या घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुरूवातीला पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकिट दराचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्यानूसार चर्चगेट ते वांद्रे १२० ते १३० आणि चर्चगेट ते बोरिवली या अंतराकरीता १७० ते १९० रुपये तर मासिक पासकरीता ५ ते ६ हजार रुपये असावेत असा प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे पाठवण्यात आला होता. यामध्ये कोणत्याही सवलतींचा विचार करण्यात आला नव्हता.

चेन्नईतील आयसीएफ या रेल्वेच्या कारखान्यात जाऊन निरीक्षण केले असून ही लोकल सहा ते सात एप्रिल रोजी मुंबईत दाखल होईल. मध्य रेल्वेकडून ठाणे ते पनवेल या मार्गावर ही लोकल चालवण्यात येणार आहे. मात्र, तिकिट दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
ब्रि.सुनिलकुमार सुद, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे