Mumbai Local Train Cancellations: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना २७ ऑक्टोबरपासून पुढील अकरा दिवस मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत २५०० हून अधिक लोकल ट्रेन सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे. विरारच्या व चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप व डाऊन दिशेच्या अनेक लोकलसेवा रद्द असणार आहेत.

सहाव्या मार्गिकेच्या निमिर्तीसाठीचे नियोजन

  • मुंबई सेंट्रल ते बोरिवली लांबी: ३० किमी
  • पहिला टप्पा- खार-गोरेगाव लांबी: ९ किमी (अंतिम मुदत: 2023)
  • दुसरा टप्पा- गोरेगाव बोरिवली लांबी: ११ किमी (अंतिम मुदत: 2025)
  • तिसरा टप्पा- मुंबई सेंट्रल ते खार लांबी: १० किमी (स्थिती: अद्याप सुरू नाही)
  • एकूण खर्च = ९१८ कोटी रुपये

पश्चिम रेल्वेने बोरिवली आणि सांताक्रूझ दरम्यान २००२ मध्ये आणि मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान १९९३ मध्ये पाचवी मार्गिका कार्यान्वित केली होती. परंतु जागेच्या कमतरतेमुळे, माहीम आणि सांताक्रूझ दरम्यानचा पट्टा पूर्ण करता आला नाही. पाचवी मार्गिका म्हणजेच उपनगरीय ट्रेन अव्हायन्स (STA) लाईन आता मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी महत्त्वाची आहे. आणि आता, मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे मार्ग संपूर्ण वेगळे करण्यासाठी करण्यासाठी बोरिवली आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सहावी मार्गिका तयार केली जात आहे.

११ दिवस मुंबई लोकलच्या किती फेऱ्या रद्द होणार?

११ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५२५ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. यापैकी ३० ऑक्टोबरला सर्वाधिक म्हणजेच ३२६ लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत तर शुक्रवारी २५६ गाड्या रद्द होणार आहेत. ६ नोव्हेंबरला केवळ २० फेऱ्या रद्द असतील. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या कालावधीत १०० ते ४०० ट्रेन सेवा रद्द करण्याचा प्रस्ताव दिला होता.

थोडक्यात बोरिवली/विरारकडे जाणाऱ्या १,२७१ आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या १,२५४ रेल्वे सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर सुरु असलेल्या गाड्या सरासरी १५ ते २० मिनिटे उशीराने धावतील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ११ दिवसांच्या कालावधीत ४३ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर १८८ गाड्यांचा प्रवास मार्ग कमी करण्यात येणार आहेत. मुख्यतः राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या व तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्या यामध्ये समाविष्ट आहेत.