मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जून २०२५ मध्ये झालेल्या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाले होते. तर, गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, लोकल ठप्प, लोकल सेवा सुरू होणे आणि त्यानंतर रेल्वे रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना लोकलची धडक लागून मृत्यू होणे, या सर्व घटनाक्रमात दोन प्रवाशांना जीव गमवावा लागला. या घटनेतून सर्वसामान्य प्रवाशांचा जीव कवडीमोलाचा आणि मुंबईत मरण किती स्वस्त झाले आहे, याचे प्रत्यंतर झाले.

मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सेवा कधी सुरू होणार याबाबत माहिती नसल्याने रेल्वे रुळावरून जात असलेल्या काही प्रवाशांना लोकलने सँडहर्स्ट रोड येथे धडक दिली. यात एका तरुणीसह दोघे ठार झाले, तर दोन महिलांसह तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. मृतांपैकी हैली मोहमाया (१९) या तरुणीची ओळख पटली. तर अन्य ४५ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. जखमींपैकी कैफ चोगले (२२), हाफिजा चोगले (६२) यांनी उपचार घेण्यास नकार दिला. तर खुशबू मोहमाया (४५) यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमीपैकी एका प्रवाशाचा खांदा निखळला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर असल्याचे जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

मुंब्रा दुर्घटनेबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. याविरोधात गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) आक्रमक झाला. सीएसएमटी परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. रेल्वे पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पाचच्या सुमारास आंदोलनात बहुसंख्य रेल्वे कर्मचारी सहभागी झाले.

लोकलसेवा ठप्प

कर्मचारी मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक यांच्या दालनाबाहेर उभे राहून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आंदोलकांनी मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांना कोंडून ठेवले होते. त्यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर पडणे अशक्य झाले. परिणामी, लोकल सेवा ठप्प झाली. सायंकाळी परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सीएसएमटीसह इतर सर्व स्थानकात प्रचंड गर्दी झाली. घटनास्थळी मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीणा यांनी पाहणी करून, रेल्वे कर्मचाऱ्यांची समजूत घातली. तसेच मध्य रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकांनी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, मागण्यांबाबत विचार करण्यात येत आहे. परंतु, प्रवाशांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत करण्यास सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना मोटरमन, लोकल व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेरून हटविले. त्यानंतर सायंकाळी ६.४५ च्या सुमारास लोकल सेवा सुरू झाली.

एक तास सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ ते ७ वर उभ्या असलेल्या लोकलपैकी एक-एक लोकल कल्याण आणि पनवेलच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. परंतु, एक तास उशिरा लोकल धावल्याने, टिटवाळा, कसारा, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, पनवेल, वाशी, वांद्रे, गोरेगाव लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. तसेच, सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या लोकलचे वेळापत्रकही बिघडले. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.

चूक नसताना, गुन्हे दाखल करणे हीदेखील चुकीची बाब आहे. अयोग्य अहवालाच्या आधारावर मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आंदोलकांना सूचित करण्यात आले. – डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी अत्यंत सखोल तपास करून तपशीलवार अहवाल तयार केला. सध्या या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा निर्णायक टप्प्यावर रेल्वे कर्मचारी संघटनांनी प्रवाशांना वेठीस धरणे, तसेच अतिगर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकांवर आंदोलन करणे, हा कायद्याने गुन्हा असून अमानवीय आहे. – सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक प्रवासी संघटना

रेल्वे कर्मचारी संघटना दोषी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन, मुंब्रा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जिवाची किंमत गौण ठरवत आहे. लाखो प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची बाजू घेणारी रेल्वे कर्मचारी संघटनेला, प्रवाशांमुळेच वेतन मिळत आहे, याचा विसर पडलेला आहे. – वंदना सोनावणे, माजी सदस्या, क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समिती, मध्य रेल्वे