मुंबई : घरगुती सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक मुंबईमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातात. गणेशोत्सवादरम्यान भाविकांना प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे / कल्याण दरम्यान रात्री जादा २२ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सीएसएमटी – ठाणे/कल्याणदरम्यान मुख्य मार्गावर जादा लोकल धावतील. तर, पश्चिम रेल्वेवर १२ लोकल फेऱ्या धावतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याणला रात्री ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि रात्री ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याणमध्ये पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल.
कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री १ वाजता सुटेल आणि रात्री २ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री २ वाजता सुटेल आणि रात्री ३ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर मार्गावर चार विशेष लोकल
अनंत चतुर्दशी निमित्ताने हार्बर मार्गावरून सीएसएमटीवरून रात्री १.३० वाजता विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून रात्री २.४५ वाजता लोकल सुटेल आणि पनवेलला पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. पनवेलहून रात्री १ वाजता विशेष लोकल सुटेल आणि रात्री २.२० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. पनवेलवरून रात्री १.४५ वाजता लोकल सुटून सीएसएमटीला रात्री ३.०५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
पश्चिम रेल्वेवरून धावणार १२ विशेष लोकल
मुंबई शहर आणि उपनगरातील बहुसंख्य सार्वजनिक मंडळाच्या आणि घरगुती गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. विसर्जनाच्या वेळी भाविकांची प्रचंड होते. भाविकांना रात्री जलदगतीने प्रवास करता यावा, गर्दी नियंत्रित करण्यासाठी, गर्दीचे विभाजन करण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री पश्चिम रेल्वेवरून १२ विशेष लोकल धावतील. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपर्यंत चर्चगेट – विरार आणि विरार – चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध होतील.
मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतात. या भाविकांना मुंबईत येण्यासाठी आणि पुन्हा मुंबईतून परतीचा प्रवास करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी सहा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चचर्गेटहून विरारसाठी रात्री १.१५, १.४५, २.१५, २.४५, ३.१५ आणि ३.४५ वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.३०, १.००, १.३०, २.०० आणि रात्री ३.०० वाजता लोकल सुटेल.