मुंबई : गेल्या तीन वर्षांत महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तपशील, पात्रता, स्थलांतर प्रमाणपत्र विद्यापीठाकडे महिन्याभरात सादर करा तरच यंदाच्या प्रवेशांना मान्यता देण्यात येईल, अशी तंबीच मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. तरीही महाविद्यालयांनी टाळाटाळ केल्यास विद्यार्थ्यांचे जे नुकसान होईल त्याला महाविद्यालये जबाबदार असतील असा इशाराही दिला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश, नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागाकडून सर्व संलग्नित महाविद्यालयांना नावनोंदणी व पात्रतेसंबंधित तपशील जमा करण्यासाठी परिपत्रकाद्वारे वारंवार सूचना देण्यात येतात. तसेच प्रलंबित प्रकरणांबाबत महाविद्यालयाच्या लॉग – ईनमध्ये पाहण्याची सोय आहे. मात्र तरीही काही महाविद्यालयांकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात टाळाटाळ करण्यात येते.
नावनोंदणी व पात्रतेसंबंधित तपशीलाअभावी परीक्षांचे निकाल व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतात. निकालाअभावी अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना अडचणींना तोंड द्यावे लागते. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांची निकालाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मात्र काही महाविद्यालयांकडून नावनोंदणी व पात्रतेसंबंधित प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया महाविद्यालयाने पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांचे पुढील परीक्षांचे निकालही राखून ठेवण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी व पात्रतेसंबंधित प्रकरणांचा तपशील तात्काळ कलिना संकुलातील प्रवेश, नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागात जमा करण्यात यावा, अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित महाविद्यालयांना एका परिपत्रकाद्वारे नुकतीच केली आहे.
वारंवार परिपत्रकाद्वारे तसेच कार्यालयात येणाऱ्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगूनही जर महाविद्यालयाने ही माहिती येत्या महिन्याभरात जमा न केल्यास संबंधित महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला महाविद्यालय सर्वस्वी जबाबदार राहील, असे मुंबई विद्यापीठाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.