मध्य रेल्वेवरील नेरुळ – उरण उपनगरीय चौथी संपूर्ण मार्गिका सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. परंतु या प्रकल्पामधील दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर – उरण दरम्यानच्या कामाला विलंब झाला असून आतापर्यंत या टप्प्यातील ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता ही कामे डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परिणामी, तोपर्यंत रेल्वेने नेरूळवरून थेट उरणला जाण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नेरुळ – बेलापूर – खारकोपर – उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यातील नेरुळ – बेलापूर, खारकोपर दरम्यानचे काम नोव्हेंबर २०१८ मध्ये पूर्ण झाले आणि पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वे सेवा प्रवाशांसाठी खुली झाली. सध्या या लोकल प्रवासासाठी प्रवाशांना २० मिनिटे लागतात.

प्रकल्पाचा एकूण खर्च ५०० कोटी रुपयांवरून सुमारे १७०० कोटी रुपयांवर पोहोचला –

भूसंपादन आणि अन्य अनेक समस्यांमुळे नेरूळ – उरण प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र प्रकल्पाचा पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. दुसरा टप्पात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, प्रकल्पाचा एकूण खर्च ५०० कोटी रुपयांवरून सुमारे १७०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. खारकोपर पुढील उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम होती. सिडकोकडून तीन किलोमीटर जागा रेल्वेला उपलब्ध झाली नव्हती. या जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आणि आता ती जागा रेल्वेला मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण दुसरा टप्पा सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उदिद्ष्ट मध्य रेल्वेने निश्चित केले होते. मात्र हा मुहूर्तही पुढे ढकलण्यात आला आहे.

खारकोपर – उरण दरम्यानची भूसंपादनाची प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण –

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात खारकोपर – उरण दरम्यानची भूसंपादनाची प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण झाली असून या टप्प्यातील ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिडकोकडून ६७ टक्के, तर रेल्वेकडून ३३ टक्के निधी उपलब्ध करण्याची तरतूद आहे. मात्र सिडकोकडून संपूर्ण निधी मिळालेला नाही. तो उपलब्ध होताच या वर्षाअखेरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करून नेरुळ – उरण संपूर्ण मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच नवीन स्थानके सेवेत येणार –

दुसरा टप्पा पूर्ण होताच पाच नवी स्थानके सेवेत येणार आहेत. यामध्ये गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण या स्थानकांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ आणि उरणवासियांबरोबरच अन्य प्रवाशांनाही फायदा होईल. यामुळे जेएनपीटी आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळही त्याला जोडले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.