मुंबई/पुणे/नागपूर : वाऱ्यांची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामे, प्रकल्प आणि दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणाने विळखा घालण्यास सुरुवात केली. मुंबई आणि नागपूरच्या हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला.

पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या वायु प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अति खराब नोंदवण्यात आली. प्रदूषणात भर पडत असताना, तापमानाचा पाराही ३५ अंशापार गेल्याने दिवाळीत गुलाबी थंडीची आस धरून बसलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

मुंबईतील हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे सकाळी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक दुपारी ३०५ वर पोहोचला. वाकडमधील भूमकर चौकात ही नोंद करण्यात आली.

नागपूर शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्याही आत असतो. परंतु रविवारी नागपूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर नोंदला गेला. पुढील काही दिवस दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पावसाळ्यानंतर वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही शहरांच्या प्रदूषणात भर घालत आहेत.

पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुल, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण एकत्र येऊन शहरे धुरकट करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

शहरांमधील हवेचा स्तर (एक्यूआय)

मुंबई | पुणे | नागपूर

बीकेसी – ३०१ | शिवाजीनगर – २४४ | वाडी – २११
कुलाबा – २४४ | पाषाण-पंचवटी – १२१ | बाबूलखेडा – १७५
देवनार – २०७ | पुणे विद्यापीठ – ११६ | सिव्हिल लाईन्स – १६७

हवा गुणवत्ता निर्देशांक

निर्देशांक – गुणवत्ता

०-५० चांगली
५१-१०० समाधानकारक
१०१-२०० मध्यम,
२०१-३०० वाईट,
३०१-४०० अत्यंत वाईट
४००हून अधिक – अतिधोकादायक

काळजी काय घ्यावी ?

तज्ज्ञांच्या मते प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.