महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज मुंबईत निधन झाले. एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. थोड्याच वेळात छगन भुजबळ रुग्णालयात दाखल होणार आहेत.

महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

अभिजात मराठी, आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, शिक्षण, समाजशोध आदी विविध विषयांवरही हरी नरके यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी आतापर्यंत ५४ पुस्तकांचे लेखन आणि संपादन केलं आहे.

गाढा अभ्यासक पडद्याआड – कोल्हे

“ज्येष्ठ विचारवंत, माझे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सरांच्या निधनाची बातमी धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! त्यांच्या निधनाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असणारे सामाजिक व पुरोगामी चळवळीतील एक उमदं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे”, असं ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पुरोगामी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेला एक ज्येष्ठ कार्यकर्ता आज हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे”, असं ट्वीट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.