मुंबई : मराठी रूपेरी पडद्यावर २००७ साली ‘साडे माडे तीन’ चित्रपटाच्या माध्यमातून रतन, मदन आणि चंदन या कुरळे ब्रदर्सच्या तिकडीने सगळ्यांचीच मने जिंकली होती. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से आदी विविध गोष्टींमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाच्या झळकलेल्या नवीन फलकावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही आहे. या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव आणि भन्नाट लूक पाहून पुन्हा एकदा हास्याचा महापूर येणार असल्याचे आपसूकच जाणवते. तर या धमाल चौकडीत अभिनेत्री रिंकू राजगुरूही पाहायला मिळणार आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया, उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. यशराज टिळेकर आणि सौरभ लालवानी सहनिर्माते, तर स्मिथ पीटर तेलगोटे सहयोगी निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत. अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद लाभलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे यावेळची जबाबदारी जास्त मोठी होती. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे’, असे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले.