मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात ३३ अंशापुढे तापमान नोंदले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाले असून रायलसीमा परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर राहील. विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी असेल, असे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावासाने ओढ दिली आहे. त्यामुळे कडक ऊन पडत आहे. जूनच्याअखेरीस पावसाने उघडीप दिली आहे. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमान
गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. तेथे मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मागील दोन दिवसाच्या तुलनेत मंगळवारी तापमानात आणखी वाढ झाली होती. त्याखालोखाल अकोला येथे ३५.२ अंश सेल्सिअस, अमरावती ३४.६, नागपूर ३४.६,आणि वर्धा येथे ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. इतर भागातही तापमानाचा पारा बऱ्यापैकी वाढलेला आहे.
पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे.
ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी
राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील, तर कोकण, खानदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात म्हणजेच मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भात ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडेल. त्याचबरोबर मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असेल. तर, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.