सध्या प्रत्येक जण हा आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनासोबत आपल्या फिटनेसकडेही लक्ष केंद्रीत करत आहे. यामध्ये राजकीय नेतेही मागे नाहीत. तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकांचा वजन कमी करण्यावर भर असतो. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपलं वजन वाढवायचं आहे. पुण्यात मनसेच्या सभेत विरोधकांवर तोफ डागल्यानंतर राज ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलतना हे वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे यांचे व्याही प्राध्यापक संजय बोरुडे यांच्या ‘जनरेशन XL’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी मुंबई पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. लठ्ठपणा हा आजार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं २०१५ मध्ये घोषित केलं आहे. याच विषयावर आधारित जनरेशन एक्स एल या लहान मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर पुस्तकाचे लेखण करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज ठाकरे यांच्यासोबत ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थित होते.

“मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल. पण आता मला शारीरिक वजन कमी करुन राजकीय वजन वाढवावे लागेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. “मी पूर्वी असा जाड नव्हतो. बरीच वर्षे माझं आणि बाळासाहेब यांचं वजन सारखाचं म्हणजे ६३ किलो होतं. पण, अचानक त्या गोष्टी वाढायला लागल्या, तसं माझं वजनही वाढायला लागलं. पण, आता शारीरिक वजन कमी करून सामाजिक वजन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. माझं वजन वाढण्याचं कारण, सध्या मी शिव्याही खूप खातो, त्यामुळे माझं वजन कदाचित वाढलं असावं,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.

“काय खावं आणि काय खाऊ नये ते आशा ताईंनी सांगितलं. त्या उत्तम सुगरण आहेत. मी घरी गेलो तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खूप जेवण बनवलं होत. मग कमी कसं खाऊ? आता खाणं कमी नाही केलं तर मी देखील नव्वदीच्या घरात जाईनं. वयाच्या नव्हे; तर वजनाच्या,” अशी मिश्किल टिपणी राज ठाकरेंनी केली.

“गेल्या काही वर्षात माझ्या आजारपणामुळे माझं वजन वाढलं. पण, सध्या घराघरांत डॉक्टर झाले आहेत. डायनिंग टेबलावर बसलं की प्रत्येकजण डॉक्टर होतो. वयानुरुप कमी खाललं पाहिजे. मी कायम ठरवतो. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. हे सर्वजणच करत असतात. मी एकटाच करतो, असे नाही. मी बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट खेळणारा. पण सध्या मला कोणत्याही एक्सरसाईज करता येत नाहीत. मला कोणताही खेळ खेळता येत नाही. त्या सर्व गोष्टीला मी विटलो आणि एकदाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेऊन टाकला. त्यानंतर मी काय धावणार आहे, अशातला भाग नाही. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की, ऑपरेशनंतर मला धावता येणार नाही. त्यावर मी त्यांना म्हटलं की मी काय पाकीटमार आहे का फार धावायला. शस्त्रक्रियेनंतर सर्व काही सुरळीत होईल, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.