शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. “बंडखोर आमदारांना बंडासाठी केवळ पैसे मिळालेले नाहीत, तर त्यांना आणखीही काही मिळालंय. याबाबत ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (५ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांनी हे कसं केलं, त्यामागे कोणती महाशक्ती काम करत होती हे लोकांना माहिती आहे. ममता बॅनर्जी यांनी यावर खूप महत्त्वाचं वक्तव्य केलंय. बंडखोर आमदारांना केवळ पैसा मिळालेला नाही, तर आणखीही काही मिळालं आहे. आणखी काही मिळालं आहे यात खूप मोठं रहस्य आहे. सुरतमध्ये, गुवाहाटी, गोवा, मुंबईमध्ये हे आमदार ११ दिवस फिरत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय.”

“मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे”

“आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

“उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत”

संजय राऊत यांना गुलाबराव पाटलांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.”

पाहा व्हिडीओ –

“कारणं सांगू नका, मंत्री झाला आहात, आता काम करा”

“जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”; उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्वीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे सोडून १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस, राऊत म्हणाले…

शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, “ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही त्यांनी लक्षात ठेवावं जे इतर १४ आमदार आहेत तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत.”