विशेष न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असं दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होतं, असे निरिक्षण नोंदवलं आहे.

कुर्ला येथील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेण्याच्या मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कटात मलिक थेट आणि हेतुपुरस्सर गुंतले होते, असे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. विशेष न्यायाधीश राहुल एन रोकडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मलिकसह डी-कंपनीच्या सदस्य हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता हडप करण्याचा गुन्हेगारी कट रचला. कोर्टाने असेही म्हटले आहे की प्रथमदर्शनी पुरावे आहेत की आरोपी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट आणि जाणूनबुजून सहभागी आहेत, म्हणून त्यांना पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोपी केले जाते. याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबई येथे माध्यमांशी बोलतान प्रतिक्रिया दिली आहे.

 “केंद्र सरकारने आधी दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणले पाहिजे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले तसं भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे तर त्याला तिथे मोकळा का सोडला आहे. मुळात दाऊद जिवंत आहे की नाही हे आधी तुम्ही स्पष्ट करावे. दाऊद कुठे आहे आणि काय करत आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्ही जगातील इतके मोठे नेते आहात. दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे त्याला पकडून घेऊन या,” असे संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना राजकारणाची माहिती कमी आहे – संजय राऊत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाळासाहेबांचे शिल्लक आहे म्हणून महाराष्ट्र सरकार चालू आहे. एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे आम्ही ऐकत होते. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे नव्हते. पण अटल बिहारी वाजपेयी यांचे आदेश आम्ही पाळले. शरद पवार हे देशाचे जेष्ठ नेते आहेत. शरद पवारांचे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांना राजकारणाची माहिती कमी आहे,” असे संजय राऊत म्हणाले.