धूळभरले आवार, खड्डय़ांचे साम्राज्य, ‘अस्वच्छतागृहां’चा अस’ा दर्प, जागोजाग थुंकीची किळसवाणी नक्षी, उपहारगृहांत घोंघावणाऱ्या माशा हे एसटीच्या विविध बसस्थानकांचे स्वरूप येत्या काळात बदलण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. त्यासाठी राज्य सरकारने एसटीला १३ बसस्थानकांचे नुतनीकरण आणि पुनर्बाधणी करण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपये देऊ केले आहेत. या १३ बसस्थानकांमध्ये ठाणे स्थानकाबाहेरील बसस्थानक, कोल्हापूर, सोलापूर, मालेगाव, कर्जत, अमरावती यांचा समावेश आहे. तर अमरावती विभागात धारणी येथे एक नवे बसस्थानक बांधण्यात येणार आहे.
राज्य सरकारने एसटीच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण, नूतनीकरण आणि नव्याने बांधकाम करण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारचा ७७८.३० लाख एवढा निधी उपलब्ध आहे. या निधीपैकी ६२२.६४ लाख रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे.
या निधीपैकी ६२.२० लाख रुपये ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याशिवाय कोल्हापूर बसस्थानकाचे आधुनिकीकरण, नूतनीकरण आणि डांबरीकरण यासाठी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीमधून ३ बसस्थानकांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यात पुणे विभागातील निरा, अहमदनगर विभागातील कर्जत आणि वर्धा विभागातील आर्वी या बसस्थानकांचा समावेश आहे. यासाठी अनुक्रमे ४०, ३८.४० आणि ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.