३३ वर्षांनंतर आला योग ’ खग्रास चंद्रग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही
भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण असा योग जुळून आला आहे. ३३ वर्षांपूर्वी १९८२ मध्ये असा योग आला होता. आता असा योग पुन्हा १८ वर्षांनंतर म्हणजे २०३३ मध्ये येणार आहे. या अगोदर १९१०, १९२८, १९४६ व १९८२ मध्ये असा योग आला असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. चंद्र ज्या वेळी पृथ्वीच्या जास्तीतजास्त जवळ येतो आणि पौर्णिमा असते त्याला सुपरमून असे म्हटले जाते. २८ सप्टेंबर २०१५ या दिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पश्चिमेस चंद्र अस्त होणार आहे. सोमवारी पहाटे आकाशात पश्चिमेला साध्या डोळ्यानी सुपरमूनचे दर्शन घेता येणार आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत हा सुपरमून पाहता येईल. चंद्रबिंब १४ टक्के मोठे दिसणार आहे. सोमवारी पहाटे सुपरमून पाहता आला नाही तर त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी पूर्व दिशेला चंद्रोदय झाल्यानंतर रात्रभर तो पाहता येईल, असे सोमण यांनी सांगितले.
सोमवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३७ पासून सकाळी ६.५७ या वेळेत होणारे हे ग्रहण महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही. हे चंद्रग्रहण गुजरातमधील राजकोट, मोर्वी, जामनगर, द्वारका, गोंडल, भूज आणि राजस्थानमधील जैसलमेर येथून दिसणार आहे. तसेच पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप, अलास्काचा पश्चिमेकडील भाग सोडून अमेरिकेतूनही दिसणार असल्याचे सोमण म्हणाले.