मुंबई : प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून पोलीस दलात नोकरी मिळवणाऱ्या पोलीस शिपायाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी यापूर्वी या पोलिसाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
आलम निझाम शेख असे त्यांचे असून ते सध्या नायगाव सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते. २०२१ मध्ये ठाणे आयुक्तालयाच्या माध्यमातून ५२१ पोलिसांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यासाठी २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातील २७ जागा प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव होत्या. त्यासाठी १३८४ प्रकल्पग्रस्तांनी समांतर आरक्षण घेतले होते. मैदानी व लेखी परीक्षेनंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली. त्यातील १३ प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयातून देण्यात आले होते. त्याची पडताळणी केली असता शेख याचे प्रमाणपत्र बीड जिल्हाधिकारी कार्यालायतून जारी करण्यात आलेले नव्हते. तसेच त्याबाबत कोणतीही नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नव्हती.
या बाबतची माहिती बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर गेल्यावर्षी ठाणे पोलिसांनी शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बनावट कागदपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी २१ जानेवारी रोजी ठाणे पोलिसांनी शेखला अटकही केली होती. त्याप्रकरणी शेखला जामीन मिळाला आहे.
शेख सध्या नायगाव सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते. त्याबाबतची माहिती नायगाव सशस्त्र मुख्यालयाला देण्यात आल्यानंतर नुकतीच शेख यांना सेवेतून काढण्यात आले. याबाबचे आदेश सशस्त्र पोलीस दलाच्या उपायुक्तांनी जारी केले आहेत.
शेख यांची कोणतीही मालमत्ता शासनाने संपादीत केली नसतानाही तसे भासवून त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. त्याअंतर्गत समांतर आरक्षण घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भरती प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या अर्जासोबत संबंधित प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जोडण्यात आले होते. त्यामुळे पोलीस दलातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी पोलिसाला सेवेतून मुक्त करण्याची कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.