मुंबई – गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळ येथील रेल्वे उड्डाणपुलाची पूर्व दिशेची बाजू रविवारपासून सुरू करण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी पुलावरील करिरोड दिशेची वाहतूक सुरू व्हावी यासाठी दबाव वाढू लागला होता. आता पालिकेच्या पूल विभागाने सहापैकी तीन मार्गिका सुरू केल्या आहेत. ४८ तासांत हा पूल सुरू करावा, असा इशारा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

लोअर परळ (डिलाईल रोड) पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ ला बंद करण्यात आला. विविध अडथळ्यांमुळे या पुलाचे काम रखडले होते. लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. लोअर परळ पुलाच्या पश्चिम दिशेची बाजू जूनमध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हा संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत वारंवार हुकली होती. गणेशोत्सवाच्या काळात लोअर परळ, करीरोड, लालबाग या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाची दुसरी बाजूही सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली होती. पूल विभागाने तशी तयारी केली होती. मात्र नंतर ही मुदतसुद्धा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

हेही वाचा – तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी गृहमंत्री असताना…”

लोअर परळ पश्चिमेकडून पूर्वेकडे यायचे तर वाहनचालकांना मोठा वळसा घालून यावे लागत होते. त्यामुळे करीरोडकडे जाणारी बाजू गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची मागणी वाढू लागली होती. स्थानिकांचा दबाव वाढू लागला होता. लोअर परेळ नागरिक उड्डाणपूल कृती समितीने गेल्या आठवड्यात बुधवारी सायंकाळी परिसरात आंदोलन केले. तर गुरुवारी आमदार आदित्य ठाकरे यांनी पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर टीका केली होती. महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासकांनी या ठिकाणी तंबू ठोकून रहावे. पुढील ४८ तासांत या पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे. पालकमंत्र्यांना उद्घाटनाला वेळ असेल नसेल तरी आम्ही याच पुलावरून गणपती आणणार, विघ्नहर्त्याला कोणी अडवू नये, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे सोमवारपासून पूल सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र एक दिवस आधीच रविवारी हा पूल सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबईत वडिलांची कार घेऊन १४ वर्षाच्या मुलाने वृद्धास चिरडले; धक्कादायक घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तरी करिरोडच्या दिशेच्या सहापैकी तीन मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण पूल सुरू होण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.