मुंबई : निवडणुकीच्या साहित्याची यंत्रे ताब्यात घेण्यापासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे ४० ते ४५ तास कालावधी लागतो. हे संपूर्ण काम प्रचंड जोखीम व जबाबदारीचे असल्याने कामगार, कर्मचारी मानसिक तणावाखाली असतात. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत मतदान केंद्रावर थांबावे लागत असल्याने निवडणुकीनंतरचा एक दिवस कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर तैनात कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करावी, तसेच त्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचीही मागणी युनियनने केली आहे.

मुंबईत महापालिकेतील सुमारे ५२ हजार कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या पदावर काम करीत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी तैनात कर्मचारी व कामगारांना निवडणूक साहित्य व मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे. कामगार – कर्मचाऱ्यांना ते साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रात जाऊन तेथे मतदान केंद्राची उभारणी, आवश्यक नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, त्या दिवशी संबंधित ठिकणी मुक्काम केल्यांनतर २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्यार्थ उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व यंत्रे जमा करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत थांबणे गरजेचे आहे. या संपूर्ण कामकाजासाठी सुमारे ४० – ४५ तास कालावधी लागतो. संबंधित काम अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे असल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचारी व कामगारांना २१ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर बोलावू नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.

हेही वाचा >>>घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, लोकसभा निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर पंखे, शौचालये, स्नानगृहे, राहण्याची सोय, अल्पोपहार, भोजन व पिण्याच्या पाण्याची योग्य सोया नसल्याने कामगार – कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल झाले होते. तसेच, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना १६५० व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांना केवळ १५० रुपये भत्ता देण्यात आला होता, त्यामुळे मतदान केंद्रस्थळी मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसह कर्मचाऱ्यांच्या पदानुसार किमान १ ते ५ हजार भत्ता देण्याची मागणी युनियनने केली आहे.