मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून तीन बांगलादेशी महिलांना मुंबईत आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकल्याचा प्रकार घडला आहे. ओळख लवपण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट आधारकार्डही तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

आरोपीने अशा प्रकारे किती महिलांची फसवणूक करून वेश्याव्यवसायात ढकलले? याबाबत पोलीस तपास करत आहेत.रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्रात चांगली नोकरी देण्याचे आमीष दाखवून महिन्याभरापूर्वी या महिलांना बेकायदेशिररित्या भारत-बांगलादेश सीमेवरून घुसखोरी करून मुंबईत आणण्यात आले होते. त्याबाबतची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली असता त्यांनी मालाड येथील मालवणी परिसरातील एनसीसी येथील एका घरावर छापा टाकला. त्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून मन्सार अहमद मोहम्मद हसन शेख (५३) याला मालवणी पोलिसांनी अटक केली. तो मालाड येथील न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी आकाश ऊर्फ शाहिन, संजीव ऊर्फ बच्चन व मेहंदी हसन या आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (३), १४४ (२) ३३६ (३), ३ (५) व अनैतिक व्यापार कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिनाभरापूर्वी मानवी तस्करी

वैद्यकीय क्षेत्रात चांगली नोकरी लावण्याचे आमीष दाखवून महिन्याभरापूर्वी या तीन महिलांना बांगलादेशातून भारतात बेकायदा आणण्यात आले. भारत-बांगलादेश सीमेवरून घुसखोरी करून त्यांना मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर मालाड येथील मालवणी परिसरात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्यातील एका महिलेच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत महिलांचेही बनावट आधारकार्ड बनवण्याचे काम सुरू होते. पण त्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकून त्या महिलांची सुटका केली व आरोपीला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनावट आधारकार्डबाबत तपास

भारतात मानवी तस्करी करून आणण्यात आलेल्या तीन बांगलादेशी महिलांपैकी एकीच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले होते. त्याबाबतची पोलीस तपास करणार आहेत. आरोपींनी ते कोणामार्फत बनवले? त्यात त्यांना कोणी मदत केली? अशा प्रकारे किती व्यक्तींचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले आहे? याबाबत तपास करण्यात येणार आहे. शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांंगितले.