मुंबई : आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे कुणी उभे राहो न राहो, पण शिवसेना त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत शेतकरऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारला सोडणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ‘मातोश्री’ वर झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देताना मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकरी दिसतोय असे विधान केले.

आठ दिवसांपूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असताना तेथील शेतकऱ्यांना शब्द दिला होतो की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचे नाही. कारण सध्याचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. खरडून गेलेल्या जमिनीला त्यांनी हेक्टरी तीन-साडे तीन लाख रुपये जाहीर केले, पण मी म्हटले होते की मदत हवी तर दिवाळीनंतर करा, पण यातील एक लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा. पण सरकारने तसे केले नाही.

तसेच कर्जाचे पुनर्गठण नाही तर कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी आहे. पण सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या चिंधड्या उडायला लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातात जेमतेम पैसे येऊ लागले आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी दिवाळीनंतर आपण पुन्हा मराठवाड्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

महाराष्ट्राने या सरकारचा अनुभव घेतलेला आहे. या सरकारला आपल्याला घालवायचे आहेच, पण सर्वप्रथम संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मैदानात उतरूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दिवाळीनंतर मराठवाड्यात येणार असलो तरी तालुका पातळीवर शिवसेनेची पथके नेमली पाहिजे. सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, ते शेतकऱ्याला मिळते की नाही हे पाहिले पाहिजे. शेतकऱ्याला ते मिळवून देण्याचे काम शिवसैनिकांनी करायचे आहे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.