या ठाकरे सरकारची घमेंड जनता उतरवेल! – आशिष शेलार

महाराष्ट्राची प्रतिमा देशभर मलिन करण्याचे काम ठाकरे सरकार का करतेय?, असा सवाल देखील केला.

संग्रहित छायाचित्र

महाविकासआघाडी सरकारकडून राज्यपालांना विमान प्रवास नाकारला गेल्याच्या मुद्य्यावरून, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“राज्यपालांना विमानातून उतरवले आहे या ठाकरे सरकारची घमेंड जनता उतरवेल! महाराष्ट्राची प्रतिमा देशभर मलिन करण्याचे काम ठाकरे सरकार का करतेय?” असं शेलार यांनी ट्विट केलं आहे.

राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं?; जाणून घ्या नेमकं काय झालं?

शेलार यांनी ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला असून ज्यामध्ये ते म्हणतात, “राज्यपाल महोदय ठरलेल्या प्रवासाला, दोन आठवडे अगोदर त्याची परवानगी घेऊन विमानतळावर गेले. तिथं विमानात गेल्यानंतर त्यांना उतरवलं गेलं. आज राज्यातील महाविकासआघाडी सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलं आहे. आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, अशा पद्धतीचं वर्तन या सरकारने केलेलं आहे.”

तसेच, “राज्यपाल हे संविधानिकरित्या या राज्याचे प्रमुख आहेत, त्याचा सन्मान जर सरकारचं ठेवणार नसेल, तर अन्य व्यवस्थेतील लोकं काय ठेवतील? त्यामुळे राज्यभरात अव्यवस्था निर्माण करायची, कुठल्याही व्यवस्था योग्यरितीने चालू द्यायच्याच नाहीत. अशा पद्धतीनची वर्तवणूक पहिल्या दिवसापासून हे महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार करत आहे.” अशी टीका देखील शेलार यांनी केली आहे.

राज्यपालांना विमानातून उतरवल्याने फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले…

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसताना राज्यपालांचा अपमर्द होत असेल, तर या देशातील ज्या संविधानिक पदाबद्दल राज्य सरकार किती गंभीर आहे, हेच स्पष्ट होतं. या ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काही माहिती नसेल, तर त्यांची आपल्या प्रशासनावर पकड आहे की नाही हे देखील स्पष्ट होतं. प्रशासनातील अशा कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत आहे? किंवा कोणत्या मंत्र्याची हिंमत आहे? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसताना देखील असा निर्णय घेतला गेला आहे. हे देखील स्पष्ट होणं आवश्यक आहे. जर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसताना असं झालं असेल, तर हा अपमान व अपमर्द करणाऱ्या मंत्री किंवा अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? याबाबत तातडीने निर्देश द्या” अशी मागणी आशिष शेलार यांनी याप्रकरणी केलेली आहे.

“अरे बापरे…”; ठाकरे सरकारला अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर

दरम्यान, राज्य सरकारने देहरादूनसाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. तर, जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Why is the thackeray government tarnishing the image of maharashtra all over the country ashish shelar msr