मुंबई: वरळी बीडीडी चाळीतील पुनर्विकास प्रकल्पापैकी फेज १ अंतर्गत ५५६ घरे बांधून पूर्ण तयार झाली आहेत. त्यामुळे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना या घरांचा ताबा गणेशोत्सवापूर्वी द्यावा, जेणेकरून येणारा गणेशोत्सव ते आपल्या नवीन घरी साजरा करतील, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. यंदाच्या वर्षअखेरपपर्यंत वरळी बीडीडी चाळीतील १६९०, नायगाव बीडीडी चाळीतील १४०० आणि ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ३४२ रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत १ मधील एकूण ८ विंगपैकी डी आणि ई या दोन इमारतींना ओसी मिळाली आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रकल्पातंर्गत तयार झालेली घरे लाभार्थ्यांना तातडीने मिळावी, यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
‘वरळी मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज १ अंतर्गत ५५६ घरे पूर्णतः तयार झालेली आहेत. ही घरे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी सज्ज असून लाभार्थ्यांना लवकरात लवकर चाव्यांचे वितरण झाल्यास ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील. लाभार्थी देखील चाव्या मिळाव्यात, यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सरकारने याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
हे लाभार्थी अजून किती दिवस भाडेतत्वावरील घरात किंवा संक्रमण शिबिरामध्ये राहणार? असा प्रश्न उपस्थित करत या प्रकल्पांतर्गत तयार झालेली नवीन घरे वितरित झाल्यास संक्रमण शिबिरे रिकामी होतील. त्यामुळे पुढील लाभार्थ्यांना तेथे स्थलांतर करता येईल आणि संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत येत्या आठवड्यात फेज १ अंतर्गत पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.