मुंबई : ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झालेला आहे. तर माझा ट्रेलर मी कालच लॉंच केला, पण पिक्चर अभी बाकी है, अशी कोपरखळी मारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीसंदर्भात आपण अजूनही लक्ष ठेवून आहोत याची जाणीव करून दिली. तसेच एका चित्रपटाचे तीन भाग येणे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वपूर्ण गोष्ट व मैलाचा दगड असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’च्या यशानंतर ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट १८ जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा सोमवार, ३० जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पार पडला. याप्रसंगी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती.दरम्यान, अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव आणि सहकाऱ्यांनी ‘येरे येरे पैसा’ चित्रपटाचा तिसरा भाग काढण्याची हिंमत दाखवलेली आहे आणि त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय ठरला होता आणि आता तिसरा भागही तितकाच लोकप्रिय होईल, अशी मी आशा बाळगतो आणि संपूर्ण चमूला मनापासून शुभेच्छा देतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
‘आपण जेव्हा चित्रपटाचे नाव सकारात्मक ठेवतो, तेव्हा चित्रपट यशस्वी ठरण्याची दाट शक्यता असते. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट यशस्वी ठरो आणि काही वर्षांनी चित्रपटाचा चौथा नवीन भाग येऊ देत आणि पुन्हा ट्रेलर लॉंचच्या निमित्ताने आपली भेट होऊ दे’, असे रोहित शेट्टी म्हणाले. तर संजय जाधव म्हणाले की, ‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाचा तिसरा भाग येणे, हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. आपण कधीकधी ज्या गोष्टी मागतो, त्या अनेकदा सहज मिळतात. ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाचा मुहूर्त झाला, तेव्हाच अमेय खोपकर यांना सांगितले होते की ट्रेलर लॉंच सोहळ्याला मला रोहित शेट्टी आणि राज ठाकरे या दोन व्यक्तींची उपस्थिती हवी आहे आणि ते ट्रेलर लॉंच सोहळ्याला उपस्थित आहेत, हा एक आनंदाचा क्षण आहे’.
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर आदी कलाकारांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.