महेश बोकडे

शासनाने एकीकडे विषाणू संक्रमणाचा धोका असल्याचे सांगत विविध परीक्षा रद्द केल्या आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी प्रशिक्षणार्थी निवड प्रवेश परीक्षेचे १६ ऑगस्टला नियोजन केले आहे. सध्या टाळेबंदीत सार्वजनिक प्रवासाची साधने नसल्याने परजिल्ह्य़ातून ये-जा करणाऱ्यांची अडचण आहे. दुसरीकडे परीक्षा केंद्रांतील गर्दीतून विषाणू संक्रमणाचा धोका असल्याने अधिकाऱ्यांत भीती आहे.

ग्रामीण व मागास भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपकेंद्र स्तरावर आरोग्यवर्धनी केंद्र सुरू आहेत. येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून बीएएमएस (आयुर्वेद), बीयूएमएस (युनानी) डॉक्टर अथवा बीएससी नर्सिग असलेल्या उमेदवारांची अकरा महिन्यांच्या कंत्राटावर नियुक्ती होते. यासाठी आरोग्य विभाग निवड प्रक्रिया राबवतो. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर सहा महिने प्रशिक्षण व त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हे अधिकारी विविध केंद्रात नियुक्त होतात. सध्या राज्यात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची १,७५४ हून अधिक पदे रिक्त आहेत.

करोना काळात ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत १२ जुलैवरून २८ जुलै केली गेली. इच्छुकांना स्वराज्यातील  आरोग्य उपसंचालक कार्यालयांत अर्ज  सादर करायचे होते. सध्या अनेक लाल क्षेत्रातील डाकसेवा बंद आहेत. त्यामुळे उमेदवार खासगी वाहनांद्वारे येऊन उपसंचालक कार्यालयांत गर्दी करत आहेत. १ ऑगस्टपर्यंत या उमदेवारांतील पात्र/ अपात्र अशी यादी लागेल. त्यानंतर हरकती मागवण्याची प्रक्रिया होऊन अंतिम यादी जाहीर होईल. दरम्यान, १६ ऑगस्टला संबंधित आरोग्य उपसंचालक कार्यालयांच्या शहरांत परीक्षेचे नियोजन होत आहे. नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयांतच सुमारे १,२०० ते १,५०० अर्ज आले आहेत. इतरही ठिकाणी हीच स्थिती आहे. आरोग्य खात्याने संक्रमण टाळण्यासाठी  बरेच नियम निश्चित केले आहेत. परंतु सध्या टाळेबंदीमुळे  सार्वजनिक प्रवासाची साधने नसल्याने उमेदवारांना वेळेवर पोहचण्याची अडचण आहे. दुसरीकडे परीक्षा केंद्रांवर  गर्दीत होऊन संक्रमणाचा धोका आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारीही घाबरलेले आहेत.

जिल्हानिहाय रिक्त पदे

गडचिरोली १६८, चंद्रपूर १७९, भंडारा ६२, गोंदिया ४९, वर्धा १८, अकोला ३१, औरंगाबाद ६२, धुळे ७८, हिंगोली ७, जळगाव ७८, जालना ३६, नांदेड १२, नंदूरबार १८, नाशिक २३४, उस्मानाबाद ३७, पालघर १०७, परभणी २३, पुणे ७०, रायगड ८२, रत्नागिरी २१८, सातारा ६९, सिंधुदुर्ग ९२, सोलापूर ८, ठाणे २६, वर्धा १८, यवतमाळ ४३ आणि इतर.

किमान उत्तीर्णसाठीचे गुण निम्मे करावे लागले

आरोग्य खात्याने फेब्रुवारी- २०२० मध्येही समुदाय आरोग्य अधिकारी पदाची भरती केली होती. तेव्हा १०० गुणांच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० गुण अनिवार्य होते. परंतु अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूप असल्याने शेवटी  किमान गुण निम्याने कमी करून अनेकांची नियुक्ती केली गेली. यंदा संक्रमणाचा धोका बघता एकूण अर्जातील सर्वाधिक गुण असलेल्यांची निवड करण्याचा पर्याय असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार सांगतात. परंतु नियमाप्रमाणे निवड प्रक्रिया राबवल्याशिवाय अशी नियुक्ती करता येत नसल्याने परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य खात्याचे अधिकारी सांगतात.

‘‘करोना काळात ग्रामीण भागात डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेवरून ही प्रक्रिया राबवली जात आहे. संक्रमण आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाणार आहे. शासनाने सूचना केल्यास त्यानुसारच पुढची कारवाई केली जाणार आहे.’’

डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक (तांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान