अनेक वृद्धांचे हाल; अ‍ॅपमधील दोषामुळे तासभर विलंब; खासगी केंद्रात लसीकरण नाहीच

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर :  वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजारांच्या रुग्णांना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शहरात प्रचंड गोंधळ उडाला. खासगी केंद्रात तर लसीकरण झाले नाही. शासकीय केंद्रावर कुठे कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक दोष तर कुठे इतर कारणांमुळे तासन्तास वृद्ध ताटकळत राहिले. गर्दीमुळे सर्वत्र शारीरिक नियमाचा भंग झाला. गर्दी बघून अनेकांनी परतीचा मार्ग धरला.

सोमवारी सकाळी ९ वाजतापासून अनेकांनी कोविन अ‍ॅप  आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणीचा प्रयत्न केला. परंतु कोविन अ‍ॅपचा सर्वर डाऊन तर आरोग्य सेतूमध्ये नोंदणीदरम्यान तांत्रिक दोष दाखवून नोंदणी होत नव्हती.  शहरातील सर्व १२ तर ग्रामीणच्या १२ पैकी काही केंद्रांवर वृद्ध गटातील व्यक्तींनी लसीकरणासाठी एकच गर्दी केली होती. येथे गर्दीच्या तुलनेत सुविधा नव्हत्या. केंद्रातही लसीकरणाच्या नोंदी होत नसल्याने अधिकारी गोंधळातच होते.

सुमारे तासभराने काही ठिकाणी नोंदणी सुरू झाली. त्यामुळे लसीकरणही सुरू झाले. गांधीनगरच्या  इंदिरा गांधी रुग्णालयात दुपारी साडेअकरानंतर लसीकरण सुरू झाले. येथे ९ ते १० पर्यंत गोंधळ उडाल्यावर अधिकाऱ्यांनी वृद्धांचे

नाव नोंदवून त्यांना घरी पाठवत

दुपारी १२ नंतर येण्याची विनंती केली. काही जण दुपारी आले तर काही आलेच नाही.  काही वृद्ध येथेच  थांबून होते.  मेडिकलमध्ये गर्दीमुळे वृद्धांना संमती अर्ज भरण्यापासून लसीकरणासाठी सुमारे एक ते दीड तासाहून अधिक कालावधी लागत होता. येथे काहींना वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार व  नावातील फरकामुळे परतावे लागले.

पहिली मात्रा घेणाऱ्यांत वृद्ध अधिक

शहरातील सर्व केंद्रावर सोमवारी लसीची पहिली मात्रा ९०१ व्यक्तींनी घेतली. त्यात ३३६ आरोग्य कर्मचारी, १२५ पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांहून अधिक म्हणजे ४१७ साठ वर्षांहून अधिक वयाचे होते. विविध आजार असलेल्या २३ जणांनी लस घेतली. एम्समध्ये साठहून अधिक वयाच्या ११२, गांधीनगरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात १६८, मेडिकलमध्ये ७५, विमा रुग्णालयात ११, आयसोलेशन रुग्णालयात २२, डागा रुग्णालयात २९ जणांनी लस घेतली.  जिल्ह्य़ात दुसरी मात्र घेणाऱ्यांत १४४ व्यक्तींचा समावेश होता. ग्रामीण भागात ४०० जणांनी पहिली मात्रा घेतली. त्यात ८२ आरोग्य कर्मचारी, १७६ पहिल्या फळीतील कर्मचारी, १५ सहआजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती, १२७ जण साठहून अधिक वयाचे  होते.

नागरिकांच्या तक्रारी

४५ वर्षांच्या व्यक्तीला  लस घ्यायची असले तर १० वर्षांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाब दोन्ही पाहिजे, अशी अट टाकण्यात आली आहे.  म्हणजे, तो ३५ व्या वर्षी खूपच कमकुवत असला पाहिजे असा या अटीचा अर्थ आहे. वाटल्यास लस नका देऊ, परंतु किमान छळ तर करू नका, अशी तक्रार एका  व्यक्तीने केली. महापालिकेच्या विविध लसीकरण केंद्रासह मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन ही लस घ्यायला आलेल्यांकडून संमतीपत्र भरून घेण्यासह इतरही लांबलचक प्रक्रिया करून घेतली जात आहे. डॉक्टरांकडून योग्य बोलले जात नसल्याची तक्रार  एका वृद्धाने केली. तातडीने खासगी केंद्र सुरू करण्याची त्याची मागणी होती.

तासभरात लसीकरण सुरळीत- डॉ. चिलकर

पहिला दिवस असल्याने  व कोविन अ‍ॅप विलंबाने सुरू झाल्याने काही केंद्रांवर लसीकरण  विलंबाने सुरू झाले. परंतु गर्दी वाढल्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात दुपारी आणखी एक  केंद्र सुरू केले. इतरही ठिकाणी  वृद्धांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली गेली. त्यामुळे सकाळी ११ नंतर सर्वत्र सुरळीत लसीकरण झाले, असे  महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले.

७७ वर्षीय वृद्धाने सायकलवर येऊन लस घेतली

तुमान, ता. मौदा येथी राधेश्याम सदाशिव पटीये या ७७ वर्षीय शेतकरी असलेल्या वृद्धाने सायकलवर मेडिकलच्या केंद्रात येऊन लस घेतली. ते सध्या त्यांच्या नागपूरला शिकणाऱ्या व महाल येथे राहणाऱ्या मुलाकडे थांबले आहेत. तेथून वर्तमानपत्रात बातमी वाचून  ही लस घेत असल्याचे  पटीये यांनी सांगितले.

इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दीत उभे असलेले वृद्ध.