महेश बोकडे

दहापटींने मागणी वाढली

उपराजधानीत दहा वर्षांमध्ये ‘ग्रीन टी’ पिण्याचे प्रमाण दहापटींनी वाढले आहे. नियमित ‘ग्रीन टी’चे सेवन फायद्याचे असले तरी गरजेपेक्षा जास्त घेतल्यास शरीराला अपायकारकही ठरू शकते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आवडीनिवडीही बदलल्या आहेत. चहासुद्धा त्याला अपवाद नाही. साध्या चहाऐवजी आता ग्रीन-टी ची मागणी वाढली आहे. चहा विक्रेता संघटनेच्या अभ्यासानुसार दहा वर्षांपूर्वी शहरात सुमारे आठ ते दहा टन चहा पवाडरची विक्री होत असे. यात ग्रीन-टी चा वाटा तीन ते पाच टक्के होता. खूप चहा पिण्याच्या सवयींमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्यावर मोठा वर्ग ग्रीन-टी कडे वळला. त्यामुळे विक्रीही वाढली. सध्या शहरात सर्व प्रकारची खुली चहा पावडर  १२ ते १५ टन विकली जाते. त्यात ग्रीन टीचा वाटा १५ ते २० टक्के आहे.

रात्री ‘ग्रीन-टी’ घेणे टाळा

‘ग्रीन-टी’ मेंदूला उत्तेजन देणारे पेय आहे. रात्री घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ  शकतो. वजन कमी करण्यासाठीही हा चहा घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. हृदय, मेंदू, मानसिक रुग्ण, त्वचा विकाराच्या रुग्णांसाठीही ग्रीन टी फायद्याची आहे.

– प्रा. डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग तज्ज्ञ, मेडिकल, नागपूर.

युवकांमध्ये  लोकप्रिय

ग्रीन-टी घेतल्याने थकवा दूर होतो, असा दावा केला जातो. यात ‘थेनाईन’ असते. त्यापासून ‘अमिनो अ‍ॅसिड ’ तयार होते व ते शरीरात ताजेपणा कायम ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हे पेय युवकांमध्ये लोकप्रिय आहे.

उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना ग्रीन टी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी, सुलभ पचनक्रियेसाठीही हा चहा लाभकारक ठरतो, असे सांगितले जाते.

‘‘देशात ‘ग्रीन-टी’ला सर्वाधिक मागणी आहे. याची विक्री दहा वर्षांत दहा पटींनी वाढली आहे. पारंपरिक चहापेक्षा थोडी वेगळी असली तरी मागणी वाढत  आहे.’’

– अनिल अहिरकर, विदर्भाचे अध्यक्ष, नाग विदर्भ र्मचट असोसिएशन, नागपूर.