11 August 2020

News Flash

नागपुरी संत्र्यांचा चीनप्रवास थांबला

उभय देशांतील तणावामुळे उत्पादकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र

चंद्रशेखर बोबडे

भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे विदर्भातील नागपुरी संत्री चीनच्या बाजारपेठेत पाठवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. त्याचा फटका संत्री उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

देशात विदर्भातील नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. संत्र्याला जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून नागपूरचे खासदार व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. फेब्रुवारी महिन्यात नागपूरच्या संत्रीचे एक कंटेनर दुबईला रवाना झाले होते. त्यानंतर चीनमध्ये असलेली मागणी लक्षात घेऊन तेथील बाजारपेठेतही संत्री पाठवण्यासाठी विदर्भातील संत्री उत्पादकांची सहकारी संस्था महाऑरेंजने केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून प्राथमिक स्तरावर चर्चाही झाली होती. ही प्रक्रिया पुढे जात असतानाच मार्च महिन्यात टाळेबंदी लागल्याने प्रक्रिया ठप्प झाली. आता चीनसोबत सीमावाद पेटल्याने  दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. यामुळे या प्रक्रियेला पुन्हा खीळ बसली आहे.

या संदर्भात महाऑरेंजचे कार्यकारी संचालक  व चीनमध्ये संत्री पाठवण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख भूमिका बजावणारे श्रीधर ठाकरे म्हणाले, चीनमध्ये पाच ते सहा हजार कोटी रुपयांची संत्र्याची बाजारपेठ आहे. ही बाब ओळखूनच आम्ही चीनमध्ये संत्री पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

तांदूळ निर्यातीलाही फटका

पूर्व विदर्भातील तांदूळही दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये पाठवला जात होता, पण आता तो जात नाही. तेथे मागणी आहे, पण तांदूळ निर्यातीची प्रक्रिया अवघड असल्याने आता निर्यात केली जात नाही. सरकारने प्रयत्न केल्यास पूर्व विदर्भासह छत्तीसगडमधील तांदूळ चीनमध्ये पाठवता येईल, असे गोंदियातील राइस मिलचे मालक अग्रवाल यांनी सांगितले.

बाजारपेठ असूनही..

चीनमध्ये संत्र्यांची पाच ते सहा हजार कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. तेथील भारतीयांसह इतरांकडूनही भारतातील संत्र्यांना मागणी असते. आधी टाळेबंदी आणि आता तणावामुळे चीनमध्ये निर्यातीसाठी केलेली तयारी थांबली आहे.

चीनमध्ये संत्री निर्यात करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली होती. दोन्ही देशांतील तणाव निवळल्यावर आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत.

– श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 12:11 am

Web Title: journey of nagpuri oranges to china stopped abn 97
Next Stories
1 पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षाही होणार!
2 ‘गट अ’ पदावर असतानाही पुन्हा परीक्षा दिल्याने इतरांना फटका
3 आयुक्तांच्या समर्थनावरुन काँग्रेसमध्ये दुफळी!
Just Now!
X