नागपुरात सहा शासकीय आरटीपीसीआर करोना चाचणी केंद्र असून येथे दिवसाला साडेपाच ते सहा हजार नमुन्यांची चाचणी होऊ शकते. परंतु येथे निम्म्याही चाचण्या होत नसल्याचे १ ते ४ डिसेंबर दरम्यानच्या चाचणी संख्येतून दिसून आले आहे. शहरात शासकीयहून जास्त चाचण्या खासगी प्रयोगशाळेत होत आहेत. राज्यात मात्र खासगीच्या तुलनेत शासकीय प्रयोगशाळेत जास्त चाचण्या झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्य़ात १ डिसेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान २२ हजार १९२ करोना संशयितांच्या चाचण्या झाल्या. त्यात ५ हजार २४८ अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. इतर १६ हजार ९४४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी झाली. एकूण चाचण्यांतील १ हजार ९२६ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे चाचणीच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण ८.६७ टक्के होते. एकूण चाचण्यांमध्ये ७ हजार ५९७ रुग्णांच्या चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत तर ९ हजार ३४७ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या. टक्केवारीनुसार, शासकीय प्रयोगशाळेत ४४.८४ टक्के तर खासगीत ५५.१६ टक्के चाचण्या झाल्या.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण खात्याच्या २ डिसेंबपर्यंतच्या अहवालानुसार राज्यात या दिवसापर्यंत १ कोटी ८ लाख १४ हजार २५३ चाचण्या झाल्या. त्यातील ६२.८६ टक्के म्हणजेच ६७ लाख ९८ हजार ९१० चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत तर ३७.१४ टक्के म्हणजे ४० लाख १५ हजार ३४३ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या. २८ ऑक्टोबरच्या अहवालानुसार, राज्यात शासकीय प्रयोगशाळेत ६१.८९ टक्के तर खासगी प्रयोगशाळेत ३८.११ टक्क्या चाचण्या करण्यात आल्या.