आळीपाळीने कामावर बोलावण्याची मागणी

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र रुळांची देखभाल दुरुस्ती जोरात सुरू करण्यात आली आहे. येथे कार्यरत ट्रॅकमन सॅनेटाईजर किंवा मास्कशिवाय कामावर असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनाही रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आळीपाळीने कामावर बोलावण्याची मागणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने केली आहे.

बुटीबोरी आणि नरखेडमध्ये रुळांची देखभाल दुरुस्ती सुरू आहे. कमीत-कमी कर्मचारी कर्तव्यावर बोलवावे, असे केंद्र सरकारचे आदेश आहेत. सध्या रेल्वेचे कार्यालय, स्थानक आणि रेल्वेच्या देखभाल दुरुस्ती केंद्रात उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मात्र, रुळाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नागपूर विभागातील सर्व पाच हजार ट्रॅकमनना कर्तव्यावर बोलावले आहे. नागपूरमध्ये सुमारे ३००, अजनीत  ९०, बुटीबोरीत ९०, नरखेडमध्ये ९० ट्रकमन कर्तव्यावर असल्याचे कामगार संघटना नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने म्हटले आहे.

रेल्वेगाडीत काम करणारे तिकीट तपासणीस, तिकीट विक्री करणारे लिपिक, विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली आहे. भरारी पथकातील काही तिकीट तपासणीस आळीपाळीने कर्तव्यावर आहेत.

मालगाडय़ा सुरू असल्याने रेल्वे नियंत्रण कक्ष आणि स्टेशन उपप्रधंबक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येत आहे. मात्र, रुळांच्या देखभाल दुरुस्ती जोरात सुरू असून १०० टक्के कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे. त्यामुळे ट्रॅकमन यांना करोनाची लागण होण्याची भीती आहे. ट्रॅकमनची संख्या कमी करावी, त्यांनाही आळीपाळीने कर्तव्यावर बोलावावे, अशी मागणी एनआरएमयूने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या सरचिटणीस यांनी पंतप्रधान यांना ट्विट केले आहे.