अभियांत्रिकी महाविद्यालयातील गंभीर प्रकार

नागपूर :  हिंगणा मार्गावरील स्थापत्य अभियांत्रिकीच्या एका नामवंत महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वर्ग सुरू असताना अचानक  अश्लील प्रतिक्रिया आणि साहित्य पाठवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह पोलीस आयुक्त व उच्च न्यायालयाकडे हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार असल्याची तक्रार केली आहे.

सध्या महाविद्यालयांचे संपूर्ण शिक्षण हे ऑनलाईन सुरू आहे. क्लासरुम, गुगलमिट, झुम अशा विविध अ‍ॅपची लिंक विद्यार्थ्यांना पाठवून त्यांवर वर्ग घेतले जातात. या लिंकवर उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया नोंदवता येतात. याचाच गैरफायदा घेत  स्थापत्य अभियांत्रिकीच्या सातव्या सत्राचा वर्ग सुरू असताना कुणीतरी अश्लील प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. सतत येत असलेल्या अश्लील प्रतिक्रिया पाहून विद्यार्थी व शिक्षकही अचंबित झाले.  अखेर वर्गच बंद करण्यात आला. याचा तपासही करण्यात आला. मात्र, प्रतिक्रिया कुणी टाकल्या हे तपासणे तांत्रिकदृष्ट्या फार अशक्य आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून महाविद्यालयाने ४० दिवसांसाठी ऑनलाईन वर्गच बंद केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

महाविद्यालयाने संबंधित विभागांना तक्रार देण्याऐवजी  शिक्षण बंद केल्याने विद्यार्थ्यांनी तक्रार केली. नागपूर विद्यापीठ आणि पोलीस विभाग व न्यायालयालाही याबाबत तक्रार दिल्याने हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

महाविद्यालय प्रशासनाने हा प्रकार घडल्याचे मान्य करीत विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू झाल्याची माहिती दिली. याशिवाय यापुढे असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सावधगिरी बाळगली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऑनलाईन वर्गाला बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरू असताना कोणत्या विद्याथ्र्याने हे केले हे जाणून घेण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आम्ही विद्यार्थ्यांना विचारले तेव्हा दोषी विद्याथ्र्याचे नाव कुणीही सांगितले नाही. अशा परिस्थितीत आम्हाला विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी वर्ग स्थगित करावे लागले. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. आमचा बहुतेक अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. महाविद्यालयाची प्रतिमा खराब होण्याच्या उद्देशाने ही तक्रार केली असल्याचेही प्रशासनाने सांगितले.